
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Lambodhara 2.0 Trailer: तंत्रज्ञानाच्या जगात होणाऱ्या वेगवान बदलांमुळे मानवी जीवन अधिक सोयीस्कर होत असलं, तरी त्याचा मानवी भावनांवर किती प्रभाव पडू शकतो? तंत्रज्ञान माणसाच्या आनंदाची व्याख्या बदलू शकतं का? अशाच काही प्रश्नांचा वेध घेणाऱ्या ‘लंबोदरा 2.0’ या सायन्स-फिक्शन सोशल थ्रिलरचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. खरा ह्युमनॉइड रोबोट, डिजिटल ट्रॅकिंग आणि ‘हॅपिनेस चॅलेंज’ यांची उत्कंठावर्धक झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
बॉलिवूडचे निर्माते महावीर जैन यांच्या महावीर जैन फिल्म्स या बॅनरअंतर्गत हा चित्रपट सादर केला जात आहे. दिग्दर्शक सिंपल सुनी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, तो कन्नड आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अशा जगाची झलक दिसते, जिथे तंत्रज्ञान केवळ मानवी भावना समजून घेण्यापुरते मर्यादित राहत नाही, तर त्यांचे निरीक्षण करून त्यांवर नियंत्रण मिळवण्याचाही प्रयत्न करते. सुरुवातीला साधे वाटणारे ‘हॅपिनेस चॅलेंज’ हळूहळू सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्यावर कसा प्रभाव टाकू शकते, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. मानवी वर्तन आणि डिजिटल ट्रॅकिंग यांच्यातील संघर्षामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
खरा ह्युमनॉइड रोबोट जिया ठरणार आकर्षण
‘लंबोदरा 2.0’च्या ट्रेलरमधील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे जिया. जियाला भारतातील पहिला खरा ह्युमनॉइड रोबोट म्हणून संबोधले जात आहे. त्यामुळे चित्रपटातील तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातून उभे राहणारे प्रश्न प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
सायन्स-फिक्शन, सामाजिक विषय आणि सस्पेन्स यांची सांगड घालणारा हा चित्रपट तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाबद्दल विचार करायला लावणारा ठरू शकतो.
‘लंबोदरा 2.0’मधून लेखक अनिल शेट्टी मुख्य भूमिकेत अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांच्यासोबत कुणाल कपूर, साची बिंद्रा, मेघना गावंकर आणि मॅक डिसूझा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सिंपल सुनी यांनी केले असून, मास प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
20 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत होणार प्रदर्शित
महावीर जैन फिल्म्स प्रस्तुत ‘लंबोदरा 2.0’ हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. तंत्रज्ञान, मानवी भावना आणि डिजिटल जगातील आव्हाने यांचा वेध घेणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.