
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Prajakta Mali : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ता सध्या तिच्या आगामी ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त राजस्थानमध्ये आहे. शूटिंगमधून वेळ काढत तिने राजस्थानमधील विविध ठिकाणांना भेट दिली. या ट्रीपमधील खास फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र, नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
प्राजक्ताने नुकताच जैसलमेर किल्ल्यावर फिरतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पिवळसर रंगाचा ओव्हरसाइज टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. हातात स्कार्फ घेऊन ती किल्ल्याच्या परिसरात धावताना दिसत आहे.
या व्हिडीओसोबत प्राजक्ताने खास कॅप्शनही लिहिले आहे. ‘अजूनही त्या आठवणींतून बाहेर पडू शकत नाहीये… मुझको भावे तेरी गलियां… #जैसलमेरदुर्ग’ असं म्हणत तिने या ठिकाणच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, ‘मला तेव्हाही जाणवत होतं आणि आजही जाणवत आहे, ती एक प्रकारची मुक्तता आणि शांतता!’ असंही तिने म्हटलं आहे.
नव्या लूकमुळेही वेधलं लक्ष
‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या आगामी चित्रपटासाठी प्राजक्ताने आपल्या लूकमध्ये बदल केल्याचं दिसत आहे. तिने केस छोटे केले असून तिच्या लूकमध्येही बदल पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अंदाजाची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. राजस्थानमधील तिच्या ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
प्राजक्ताच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने, ‘आमच्या महाराष्ट्राची स्टार राजस्थानमध्ये चमकत आहे,’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरने तिच्या आनंददायी सहलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मात्र, एका नेटकऱ्याच्या कमेंटने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. ‘सॉरी पण पाठमोरी मला खरंच गौरव मोरे वाटली,’ अशी कमेंट करत त्याने प्राजक्ताची तुलना अभिनेता गौरव मोरेशी केली आहे. त्यामुळे तिच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सध्या प्राजक्ताचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.