
फोटो सौजन्य - Social Media
लक्ष्मीकांत बेर्डे तसेच अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत आणि बरीच मोठी नावे आहेत. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे आजही मोठ्या संख्येने पाहिले जातात. अशामध्ये अभिनेते अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे, जे सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. त्यांनी थेट “लक्ष्य मला फॉलो करायचा!” असे म्हंटले आहे, त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चाहत्यांची मने दुखावली आहेत.
काय म्हणाले जेष्ठ अभिनेते अशोक सराफ?
एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणतात की “लक्ष्या एक टॅलेंटेड आर्टिस्ट होता. छोटी मोठी रोल करून तो पुढे आला. लक्ष्याने केलेले रोल तुम्ही पाहिलेत तर त्याचे आणि माझे रोल हे जरा मला फॉलो केल्यासारखे आहेत. त्याने स्ट्रेट मला फॉलो केलेलं आहे, पण वेगळ्या स्टाईलमध्ये! स्टाइल वेगळी होती पण एकंदरीत टायमिंग सारखीच होती. तो माझा नेहमी सहाय्यक होता. म्हणजे मी सिनेमात हिरो असलो तर तो माझा भाऊ असणार किंवा ड्राइव्हर किंवा इतर कोणी!”
“लक्ष्मीकांत बेर्डे मला फॉलो करायचा” “माझा सहाय्यक होता” अशा विधानांमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशोक सराफांचे हे वक्तव्य त्यांना मुळीच आवडलेले दिसत नाही आहे. याउलट या वक्तव्यांचा विरोध होत आहे.
‘या’ सिनेमांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डेसह दिसून आले अशोक सराफ
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर तसेच महेश कोठारे… हे फक्त नाव नव्हे तर हे त्याकाळचे मनोरंजन आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, अफलातून तसेच फेकाफेकी अशा अनेक सिनेमांमध्ये कामे केली आहेत. अनेक चित्रपटांमध्ये ही जोडी अजरामर ठरली आहे.