
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Nana Patekar Passed Away: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी गोव्यातील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांच्या दमदार अभिनयासोबतच त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्सेही कायम चर्चेत राहिले. त्यापैकीच एक किस्सा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याशी संबंधित आहे.
नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांची मैत्री मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष चर्चेत राहिली. दोघांनीही आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. नाना पाटेकर यांच्या संघर्षाच्या काळात अशोक सराफ यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. तर एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा नाना पाटेकर यांनी अशोक सराफ यांचा जीव वाचवत त्यांच्यासाठी देवदूताची भूमिका बजावली होती.
या घटनेचा उल्लेख स्वतः अशोक सराफ यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता. हा प्रसंग प्रसिद्ध मराठी नाटक ‘हमीदा बाईची कोठी’च्या प्रयोगादरम्यान घडला होता.
‘हमीदा बाईची कोठी’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रयोग रद्द करण्याची वेळ आली. मात्र प्रयोग रद्द झाल्याने प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. परिस्थिती हळूहळू नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आणि संतप्त जमावाने कलाकारांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.
अचानक निर्माण झालेल्या या गोंधळामुळे कलाकारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत नाना पाटेकर यांनी प्रसंगावधान राखत अशोक सराफ यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला.
अशोक सराफ यांच्या कथनानुसार, गोंधळ सुरू असताना नाना पाटेकर यांनी त्यांना अंधारात सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांनी अशोक सराफ यांना रिक्षेत ओढून बसवले आणि त्यांना जमावापासून दूर सुरक्षित ठिकाणी नेले.
त्या क्षणी नाना पाटेकर यांनी दाखवलेल्या धाडसामुळे अशोक सराफ यांचा जीव वाचला. या घटनेची आठवण सांगताना अशोक सराफ यांनी नानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.
‘नाना नसते तर माझं काय झालं असतं माहीत नाही’
अशोक सराफ यांनी सांगितले होते की, त्या प्रसंगी नाना पाटेकर मदतीला धावून आले नसते तर परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकली असती. संतप्त जमावाच्या तावडीतून नानांनी त्यांना बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.
त्यामुळे त्या कठीण प्रसंगी नाना पाटेकर हे अशोक सराफ यांच्यासाठी अक्षरशः देवदूत ठरले होते. दोघांमधील मैत्री केवळ पडद्यावर किंवा रंगमंचावरची नव्हती, तर संकटाच्या काळात एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहणारी होती. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हा जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला असून त्यांच्या आणि अशोक सराफ यांच्या मैत्रीची आठवण अनेकांना होत आहे.