
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Mallika Sherawat: बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचं मल्लिकाने कौतुक केलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर इडली आणि चटणी खातानाचा व्हिडीओ शेअर करत मुंढे यांच्या अन्नसुरक्षेसाठी सुरू असलेल्या कारवाईबद्दल त्यांचे आभार मानले.
मल्लिका शेरावतने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती इडली आणि चटणी खाताना दिसत आहे. यावेळी तिने तुकाराम मुंढेंना उद्देशून कौतुकाचे शब्द म्हटले.
“तुमच्यामुळे आता मी कोणतीही चिंता न करता जेवण करू शकते. तुमचे कठोर नियम आणि आदर्श आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवत आहेत. तुमच्या नजरेतून काहीही सुटत नाही. तुमचे खूप खूप आभार,” अशा आशयाचं वक्तव्य तिने केलं.
मल्लिकाने पोस्टच्या कॅप्शनमध्येही तुकाराम मुंढे यांच्या कामाबद्दल कौतुक व्यक्त करत, ते करत असलेल्या कामाची आपण मनापासून प्रशंसा करत असल्याचं म्हटलं आहे.
तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अन्नसुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभर तपासण्या आणि कारवाया सुरू आहेत. २५ मे ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील विभागनिहाय आकडेवारीनुसार पुणे विभागात ४,२६१ तपासण्या आणि १६८ परवाने निलंबित, तर ग्रेटर मुंबईत १,४५१ तपासण्या आणि १२१ परवाने निलंबित करण्यात आले.
याशिवाय कोकण विभागात ३,१४२ तपासण्या आणि १०८ परवाने निलंबित करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या कारवायांमध्ये रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणं आणि इतर खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून खाद्यपदार्थांशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. सेलिब्रिटी एंडोर्समेंटच्या प्रकरणातही FDA ने काही बॉलिवूड कलाकारांना नोटिसा बजावल्याचं अलीकडच्या रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.
मल्लिकाच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सनी अभिनेत्रीने तुकाराम मुंढेंच्या कामाचं कौतुक केल्याबद्दल तिची प्रशंसा केली. विशेष म्हणजे, मल्लिकाने या व्हिडीओमध्ये मराठीतून मुंढेंचे आभार मानल्याने तिच्या मराठी बोलण्याचीही चर्चा होत आहे.