
फोटो सौजन्य - Social Media
गेल्या दशकभरात मराठी संगीताचा चेहरामोहरा मोठ्या प्रमाणात बदलला आहे. पारंपरिक लोकसंगीताचा गोडवा जपत मराठी संगीत आता पाश्चिमात्य संगीतशैलींशीही सुरेख मेळ घालत आहे. लावणी, तमाशा आणि भारूड यांसारख्या पारंपरिक प्रकारांच्या पलीकडे जात मराठी संगीताने हिप-हॉप, इंडी पॉप आणि जॅझसारख्या आधुनिक शैलींचाही स्वीकार केला आहे. अशाच नव्या संगीतप्रयोगाचा अनुभव प्रेक्षकांना आगामी ‘स्वप्नसुंदरी’ या चित्रपटातील ‘आली आली नवरी’ या नव्या गाण्यात मिळणार आहे.
लग्नसोहळ्याच्या पारंपरिक उत्साहाला आधुनिक संगीताचा साज चढवणारे हे गाणे सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मराठी शब्दांसोबतच दैनंदिन वापरातील हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा सहज वापर करून या गाण्याचे बोल अधिक आकर्षक करण्यात आले आहेत. त्याचबरोबर विविध पाश्चिमात्य वाद्यांचा (Instruments) प्रभावी वापर गाण्याला वेगळी ओळख देतो.
या गाण्याला रोहित राऊत आणि रीशिका मुखर्जी यांनी आपल्या दमदार आवाजाची साथ दिली आहे. संगीतकार अंकुश बोरडकर यांनी या गाण्याला आधुनिक संगीताचा साज चढवला असून, प्रशांत माडपुवार यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याच्या कोरसमध्ये दत्तात्रय मेस्त्री, मयुरेश माडगावकर, कौस्तुभ पाटील, गोपाल ठाकरे, रत्ना परब, नाजुका विरकर आणि सुप्रिया कदम यांच्या आवाजाची साथ लाभली आहे. तसेच ईशान देवस्थळी यांनी गाण्याचे व्होकल प्रॉडक्शन आणि एकूण ध्वनीरचना (Vocal Arrangement) सांभाळत या गाण्याला अधिक समृद्ध रूप दिले आहे. संपूर्ण संगीत टीमच्या एकत्रित मेहनतीमुळे ‘आली आली नवरी’ हे गाणे पारंपरिक मराठी लग्नसोहळ्याला आधुनिक संगीताची झलक देणारे वैशिष्ट्यपूर्ण गाणे ठरले आहे.
‘स्वप्नसुंदरी’ हा बहुप्रतिक्षित मराठी रोमँटिक चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. रेडबेल मीडिया निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात भूषण प्रधान आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत झळकणार असून, अशोक शिंदे, शिल्पा नवकर आणि माधवी जुवेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती सतीश महादेव गेजगे यांनी केली असून, संगीताची धुरा अंकुश बोरडकर यांनी सांभाळली आहे. तसेच शान, कुणाल गांजावाला, अभिजीत सावंत, आर्या आंबेकर आणि रोहित राऊत यांसारख्या लोकप्रिय गायकांनी चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. रोमँस, संगीत आणि भावनांचा सुरेख मिलाफ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.