
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Akshaya Naik : नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवानंतर दसऱ्याचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. दसऱ्याला सोनं लुटण्याची आणि आयुष्यातील खास क्षण साजरे करण्याची परंपरा आहे. अशातच अभिनेत्री अक्षया नाईकनेही आपल्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ‘लग्न आणि बरंच काही’ या आगामी मराठी चित्रपटातून ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार असून, हा क्षण तिच्यासाठी एखाद्या सोनेरी क्षणापेक्षा कमी नाही.
अक्षया नाईकचा ‘लग्न आणि बरंच काही’ हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती एका खास भूमिकेत दिसणार आहे. हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने तिच्यासाठी हा अनुभव विशेष महत्त्वाचा आहे. छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता मोठ्या पडद्यावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती सज्ज झाली आहे.
मोठ्या पडद्यावर झळकण्याचं स्वप्न होणार पूर्ण!
अक्षया नाईकने हिंदी टेलिव्हिजनच्या माध्यमातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. विविध भूमिकांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘तस्करी’ या प्रोजेक्टच्या माध्यमातून तिने नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली छाप पाडली. आता मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी ती उत्सुक आहे.
आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल भावना व्यक्त करताना अक्षया म्हणाली, “कधीतरी आपण मोठ्या पडद्यावर झळकावं, हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आणि हेच स्वप्न माझं देखील होतं. आज हे स्वप्न या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होतंय. उत्तम कलाकार, स्त्री फळी असलेला चित्रपटाचा कणा हे सगळंच खूप कमाल आहे. आपण अशा एका चित्रपटाचा भाग होतोय, हे भाग्य आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.”
‘लग्न आणि बरंच काही’ हा चित्रपट अक्षया नाईकच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. छोट्या पडद्यावरील कामानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील तिची भूमिका कशी असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने व्यक्त केलेल्या भावना आणि तिच्या नव्या प्रवासाची सुरुवात यामुळे हा क्षण तिच्यासाठी खऱ्या अर्थाने ‘सोनेरी’ ठरला आहे.