
Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बालपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं… एखादा रंगीत दगड म्हणजे खजिना, एखादी काठी म्हणजे जादूची कांडी आणि एका बंद दरवाजापलीकडचं जग म्हणजे एक मोठं स्वप्न! याच निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची हळूवार गोष्ट सांगणाऱ्या ‘चिकिझिंग’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आलं. त्यासोबतच हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत, १२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत ‘चिकिझिंग’ या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बागते या चित्रपटाच्या निर्मात्या असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, ऋषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण, उन्मेश कुलकर्णी सहनिर्माते आहेत. राजेंद्र बागते आणि वैभव कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एका हिलस्टेशनच्या पार्श्वभूमीवर घडणारी ‘चिकिझिंग’ची कथा आहे, गरिबीच्या परिस्थितीत वाढणाऱ्या एका चुणचुणीत, स्वप्नाळू आणि खोडकर मुलाची. Chikizing Marathi Movie:
दर शनिवारी आईसोबत एका श्रीमंत निवासी शाळेत जाणारा चिक्या त्या शाळेच्या भव्य जगाने भारावून जातो. बंद असलेलं भलंमोठं लोखंडी गेट आणि त्याच्या आतलं अनोखं विश्व… हे सगळं त्याला स्वप्नवत वाटतं. त्या स्वप्नाचा गुप्तपणे पाठलाग करण्याचा प्रवास, त्याची सगळी गुपितं जपून ठेवणारा त्याचा एकमेव मित्र म्हणजे स्ट्रॉबेरीच्या शेतातलं बुजगावणं; त्याच्याशी गप्पा, तायडीसोबत लाकूडफाटा गोळा करणं, दिवाळीत इतर मुलांनी फटाके फोडताना लांबून ते पाहणं, वेगवेगळ्या वस्तू आपल्या शाळेच्या दप्तरात जपून ठेवणं… या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याचं जग उलगडत जातं. पण या सगळ्या अतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी तो का करतो? ही फक्त निरागसता आहे का? त्याच्या मनात नेमकं काय चाललंय? त्याच्या रडारवर काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला गेला आहे.
‘चिकिझिंग’ हा केवळ मुलांसाठीचा चित्रपट नसून मुलांसोबत पालकांनीही अनुभवावा असा बालपण, स्वप्नं, कुटुंब आणि आशावाद यांचा हळुवार उत्सव आहे. आजच्या धावपळीच्या जगात मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांना पुन्हा एकदा जवळून पाहण्याची संधी देणारा हा चित्रपट आहे. कारण प्रत्येक मुलाच्या मनात एक स्वप्न असतं.
या चित्रपटात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, डॉ. सोनाली घाटणेकर इ. कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘चिकिझिंग’ यंदाच्या दिवाळीत — १२ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात! एक गोष्ट मुलांच्या स्वप्नांची… आणि मोठ्यांना पुन्हा एकदा त्यांचं बालपण आठवून देणारी.