Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पोस्टरमध्ये विराट रूपातील हनुमंताची मूर्ती लक्ष वेधून घेते. तिच्यासमोर पाठ करून उभा असलेला तरुण हातात भगवा कपडा घेऊन उभा आहे. एका बाजूला भव्य हनुमंताचं रूप तर दुसरीकडे किल्ला, भगवे ध्वज आणि आकाशात पसरलेला सोनेरी प्रकाश, यामुळे पोस्टरला प्रभावी आणि सिनेमॅटिक रूप मिळाले आहे. या दृश्यातून या तरुणाच्या आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या महत्त्वपूर्ण घटनेची झलक मिळते.
पोस्टरमधील या तरुणाचा हनुमंताशी नेमका काय संबंध आहे, त्याच्या आयुष्यात कोणता प्रसंग घडतो आणि या भव्य पार्श्वभूमीमागची कथा काय आहे, असे अनेक प्रश्न पोस्टर पाहिल्यानंतर निर्माण होतात. मात्र चित्रपटाच्या कथेचा फारसा उलगडा न करता निर्मात्यांनी ही उत्सुकता कायम ठेवली आहे.
‘बजरंगी’च्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव दिसणार असून त्याची ही भूमिका चित्रपटाच्या कथेत नेमकं काय वळण आणणार याची उत्सुकता आहे. सिद्धार्थ जाधव या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या अंदाजात येणार आहे.
‘बजरंगी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस लोखंडे यांनी केलं असून, लेखन हेमंत एदलाबादकर यांचं आहे. अवंतिका सिने एंटरप्राइजेस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेविषयी काही महत्त्वाचे संकेत मिळत असले तरी त्यामागची संपूर्ण कथा आणि व्यक्तिरेखांचा प्रवास चित्रपटातूनच उलगडणार आहे.
View this post on Instagram
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणाले, “‘बजरंगी’ची कथा एका अशा प्रसंगापासून सुरू होते, जो स्वतःमध्येच अनेक प्रश्न निर्माण करतो. श्रद्धा आणि अविश्वास यांच्यात अडकलेल्या एका माणसाचा हा प्रवास आहे. या प्रवासातून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अनपेक्षित गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. पोस्टरमधून आम्ही कथेचा फारसा उलगडा न करता उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातून ही कथा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा आहे.”






