
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Gokul Election: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. या निवडणुकीतील राजकीय घडामोडींवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता मनोरंजनविश्वातही गोकुळची चर्चा रंगली आहे. ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता रमेश परदेशी अर्थात पिट्याभाई याने अभिनेता आणि लेखक राजकुमार तांगडे यांना सोशल मीडियावर एक खोचक सवाल केला आहे. ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ असा थेट प्रश्न त्याने विचारला. यानंतर दोन्ही कलाकारांमध्ये कमेंट्समधून चांगलीच जुगलबंदी रंगली असून त्यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला १२ जागा मिळाल्या. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने या निवडणुकीला वेगळं वळण मिळालं. याच राजकीय घडामोडींवर अभिनेता आणि लेखक राजकुमार तांगडे यांनी फेसबुकवर एक मिश्कील पोस्ट लिहिली.
‘बारातून तेरा गेले, खाली राहिले उणे एक, मग पंचवीसमध्ये हातचे चार घेतले, बरोबर झाले सोळा. आता लोकशाहीची हत्या झाली म्हणून कोर्टात हातपाय चोळा, तोवर आम्ही खातो गोकुळच्या लोण्याचा गोळा…’ अशा शब्दांत त्यांनी गोकुळच्या निवडणुकीवर उपरोधिक भाष्य केलं.
‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा थेट सवाल
राजकुमार तांगडे यांच्या या पोस्टवर अभिनेता रमेश परदेशी याने कमेंट करत त्यांना थेट सवाल केला. ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ अशी खोचक टिप्पणी त्याने केली. त्यावर राजकुमार तांगडे यांनीही मिश्कील उत्तर दिलं. ‘माझं पोट शेतीवर आहे आणि मला धार काढता येते बरं का रमेशराव…’ असं त्यांनी म्हटलं.
यानंतर रमेश परदेशी यानेही आपण शेतकरी असल्याचं सांगत उत्तर दिलं. ‘अहो, आम्ही पण शेतकरी आहोत आणि पार्ट टाइम अभिनय करतो. आमच्याकडे १० गाई आहेत आणि धारा काढण्यासोबत आधुनिक यंत्रणाही आहे,’ असं त्याने कमेंटमध्ये नमूद केलं.
रमेश परदेशीच्या उत्तरानंतर राजकुमार तांगडे यांनीही आपल्या शेतीबद्दल सांगितलं. आपल्याकडे लहान-मोठ्या मिळून दहा ते पंधरा म्हशी असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण मराठवाड्यातील असल्यामुळे अद्याप धार काढण्याचं मशीन नसल्याची मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. त्यावर कोल्हापूरचा असो किंवा मराठवाड्यातील, शेतकरी एकच असतो, असा भावही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सुरू झालेली ही सोशल मीडिया जुगलबंदी आता चर्चेचा विषय ठरली आहे. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना दोन्ही कलाकारांनी आपापल्या शेतीचा आणि शेतकरी असण्याचा उल्लेख केल्याने त्यांच्या कमेंट्सकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.