( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Jaywant Wadkar on Lalbaugcha Raja: गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या सणांपैकी एक आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर भक्त मोठ्या श्रद्धेने बाप्पाची पूजा करतात आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र, यंदा गणेश विसर्जनादरम्यान काही ठिकाणी गणेशमूर्ती कोसळल्याच्या घटना घडल्या. या घटनांवरून काही गणेश मंडळांवर टीकाही होत आहे. अशातच मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
जयवंत वाडकर यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पूर्वीच्या विसर्जनाची आठवण सांगत सध्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
ते म्हणाले, “लालबागच्या राजाचं विसर्जन आम्ही कोळी लोक एकत्र करायचो. आता Hydraulic Trolley आल्या आहेत. यावर्षी जवळपास ११ ते १२ माझ्या माहितीतल्या गणेशमूर्ती अपघातांमुळे कोसळल्या आहेत. गणपती बाप्पा आपल्याला श्राप देत आहेत असं वाटतंय. सगळ्यात आधी भुलेश्वरची गणेशमूर्ती कोसळली.”
यंदा घडलेल्या या घटनांवर जयवंत वाडकर यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकारानंतर त्यांचा भाऊही संतापल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच सर्व गणेश मंडळं आणि शासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
“यावर काहीतरी तोडगा काढा. यामध्ये मधला दुवा काढण्याची गरज आहे,” अशी विनंती त्यांनी केली.
‘आता सगळीकडे राजे झाले आहेत’
गणेश मंडळांमध्ये वाढलेल्या स्पर्धेबाबतही जयवंत वाडकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “पूर्वी लालबागचा राजा हा केवळ एकमेव राजा होता आणि गणेश गल्लीचा. आता सगळीकडे राजे झाले आहेत. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्येही ‘सोसायटीचा राजा’ असे फलक लावण्यात येतात.”
ही स्पर्धा थांबायला हवी, असंही त्यांनी म्हटलं. “ही स्पर्धा आता बंद झाली पाहिजे, असं वाटतं. ही स्पर्धा जेव्हा बंद होईल, तेव्हा सर्व सुरळीत होईल. गणेशोत्सव आनंद आणि लोकांना एकत्र करण्यासाठी आहे. सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे,” असं जयवंत वाडकर म्हणाले.
गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जयवंत वाडकर यांनी मांडलेल्या या मताची सध्या चर्चा होत आहे. विसर्जनाची पद्धत, मंडळांमधील वाढती स्पर्धा आणि गणेशोत्सवाचं मूळ स्वरूप याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.






