
फोटो सौजन्य - Social Media
या पुरस्कारामध्ये १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह तसेच शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे. मूळचे यवतमाळचे असलेल्या जयंत माईणकर यांचा पत्रकारितेतील प्रवास तब्बल ३८ वर्षांहून अधिक काळाचा आहे. त्यांनी ‘द फ्री प्रेस जर्नल’, ‘पीटीआय’, ‘हितवादी’ आणि ‘यूएनआय’मध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. विशेष म्हणजे यूएनआयमध्ये त्यांनी मुंबई ब्युरो प्रमुख म्हणूनही काम केले आहे.
इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेले माईणकर सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘सामना’ आणि ‘देशोन्नती’ या वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करतात. ‘देशोन्नती’मधील त्यांचा ‘कटाक्ष’ हा राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर भाष्य करणारा स्तंभ गेल्या अनेक वर्षांपासून वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. नुकतेच त्यांच्या ‘कटाक्ष’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. यापूर्वीही पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. आता ‘मधुसूदन रावकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाल्याने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या पुरस्कारांचे वितरण सोमवार, २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार आणि ‘द प्रिंट’चे संपादक शेखर गुप्ता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये रामकृष्ण खांदारे, दिगंबर सावंत, राजेंद्र साळसकर, संदीप पागडे आणि ज्ञानदा कदम यांचा समावेश असून विविध पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.