
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
New Marathi Movie:मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता कोकणभूमीत परमपूज्य मानल्या जाणाऱ्या सद्गुरू श्री साटम महाराजांची जीवनगाथा प्रथमच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज’ असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना महाराजांचे आध्यात्मिक जीवन, त्यांची शिकवण आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून, त्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाकाली प्रॉडक्शन आणि स्मिता क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दाणोलीश्वर’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. मिलिंद सावंत, सुषमा मिलिंद घोगळे सावंत आणि स्मिता घाग हे चित्रपटाचे निर्माते आहेत, तर रणजित विठ्ठल चव्हाण सहनिर्माते आहेत. कमलवल्लभदास लिखित ‘दाणोलीश्वर’ या पुस्तकाचा संदर्भ घेऊन पराग कुलकर्णी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. विराज राजे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
या चित्रपटासाठी सद्गुरू चिटणीस बाबा (डॉ. शशिकांत चिटणीस), प.पू. बाळूमामा दळवी (शिरसंगी) यांच्या आशीर्वादासह दाणोली समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकारी मंडळ, बबी देवळे, श्रीमंत सरकार खेमराज शिवराम राजे सावंत भोसले आणि दाणोली बाजार तरुण मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे.
कोण होते सद्गुरू श्री साटम महाराज?
समर्थ शंकर साटम महाराज यांचा जन्म १८८४ साली अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर झाला. मुंबईतून एका सामान्य व्यक्तीप्रमाणे सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे आध्यात्मिक वळणावर पोहोचला. भारतभ्रमण केल्यानंतर त्यांची पावले कोकणातील पावन भूमीकडे वळली. सावंतवाडी परिसरातील दाणोली या गावात त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला स्थैर्य लाभले.
महाराजांनी १९३७ पर्यंतच्या आपल्या वास्तव्यात अनेक लीला केल्याचे भाविक मानतात. संकटात सापडलेल्या भाविकांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवन सावरण्याचा आणि समाजाला मानवी मूल्यांची शिकवण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दाणोली येथे समाधी घेतल्यानंतरही त्यांच्याविषयी भाविकांच्या मनात श्रद्धा कायम आहे.
साटम महाराजांची शिकवण मोठ्या पडद्यावर उलगडणार
सद्गुरू श्री साटम महाराजांचे जीवनकार्य, त्यांची शिकवण आणि आध्यात्मिक विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘दाणोलीश्वर’ या चित्रपटातून करण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विराज राजे यांनी यामागील उद्देश स्पष्ट केला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत यापूर्वीही साधू-संत आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चित्रपट आले आहेत. आता या यादीत ‘दाणोलीश्वर’ची भर पडणार आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्याच्या कथेविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
‘दाणोलीश्वर’ चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. विशेषतः सद्गुरू श्री साटम महाराजांची मुख्य भूमिका कोणता अभिनेता साकारणार, याबाबत निर्मात्यांनी गुप्तता राखली आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी कोणाची निवड झाली आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. आता चित्रपटातील कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख याबाबत निर्माते पुढे काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.