
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Maharashtra Epstein Files:महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, “2 ऑक्टोबरला सगळंच उघड होणार…” या टॅगलाइनने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले होते. स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत आणि भीतीचे वातावरण निर्माण करून त्याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणात अशोक खरातला अटक करण्यात आली असून, तो सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही राजकीय व्यक्तींशी संबंधित फोटो समोर आल्यानेही हे प्रकरण चर्चेत आले होते.
या संपूर्ण घटनाक्रमावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. अभिनेत्री दिपाली सय्यद या चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
टीझरमध्ये एका गंभीर आणि संवेदनशील विषयाची झलक पाहायला मिळत असून, या प्रकरणामागचं सत्य आणि घटनांचा प्रवास मोठ्या पडद्यावर कसा मांडला जाणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत करत असून सध्या चित्रपटाचे चित्रीकरण वेगाने सुरू आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. चित्रपटाचे छायांकन आकाश काकडे करणार असून कला दिग्दर्शनाची जबाबदारी अक्षय आंबेकर यांच्याकडे आहे. महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि सोशल मीडियावर याची किती चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.