
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Suraj Chavan Daughter Name: ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सूरज आणि त्याची पत्नी संजना यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले. आई-बाबा झाल्यानंतर दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. सूरजने आपल्या लेकीचे अगदी थाटामाटात स्वागत केले. विशेष म्हणजे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याने आपल्या चिमुकलीची पूजा करत तिचे खास स्वागत केले होते. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
संजनाने कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी ‘आमच्या घरी राधा आली’, असे म्हणत सूरजने आपल्या लेकीचे स्वागत केले होते. त्यामुळे सूरज आपल्या मुलीचे नाव राधा ठेवणार, असा अंदाज अनेक चाहत्यांनी बांधला होता. तर काही जणांकडून सरस्वती हे नावही चर्चेत होते. मात्र, सूरजने या सर्व अंदाजांना चुकीचे ठरवत आपल्या लेकीसाठी एक वेगळेच नाव निवडले आहे.
सूरज आणि संजना यांनी आपल्या चिमुकलीचे नाव ‘तृष्णा’ असे ठेवले आहे. नुकतेच सूरजने आपल्या लेकीचे नाव जाहीर केले असून, या नावाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. राधा किंवा सरस्वतीऐवजी तृष्णा हे नाव निवडल्याने चाहत्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.
काय आहे ‘तृष्णा’ नावाचा अर्थ?
सूरज चव्हाणने आपल्या लेकीसाठी निवडलेल्या ‘तृष्णा’ या नावाचा अर्थही खास आहे. संस्कृतमधील ‘तृष्’ या धातूपासून हा शब्द तयार झाला आहे. या नावाचा अर्थ तीव्र इच्छा, आकांक्षा किंवा एखादी गोष्ट मिळवण्याची मनापासून असलेली ओढ असा होतो. आध्यात्मिक आणि तात्त्विक दृष्टिकोनातून तृष्णा म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र आंतरिक इच्छा. त्यामुळे या नावामागे एक वेगळाच अर्थ दडलेला आहे.
सूरज चव्हाण आणि संजना यांचा विवाह २०२५ मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली होती. आता लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात चिमुकलीचे आगमन झाल्याने त्यांच्या आनंदात भर पडली आहे. लेकीच्या स्वागतापासून ते तिच्या नामकरणापर्यंत सूरजचे खास क्षण चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.