(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Kishor Kadam: मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते किशोर कदम लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटात ते एका दमदार पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या किशोर कदम यांना या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
किशोर कदम यांनी आजवर मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक वेळी वेगळ्या स्वभावाची आणि भावविश्वाची व्यक्तिरेखा निवडत त्यांनी आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध केली आहे. ते उत्तम अभिनेते असण्यासोबतच एक संवेदनशील कवीदेखील आहेत. त्यांच्या कविता सादर करण्याच्या खास शैलीत एक वेगळी लय जाणवते. हीच लय त्यांच्या संवादफेकीतही पाहायला मिळते. त्यामुळे ‘जिजाई’मधील त्यांची पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना किशोर कदम म्हणतात, “‘जिजाई’मध्ये मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेकडे केवळ एक पोलिस इन्स्पेक्टर म्हणून पाहता येणार नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वामागेही काही अनोखे पैलू आणि एक स्वतंत्र भावविश्व दडलेले आहे. प्रत्येक भूमिकेतून काहीतरी नवीन शोधण्याचा माझा प्रयत्न असतो. या भूमिकेच्या निमित्तानेही मला एक वेगळा अनुभव घेता आला. प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा नक्कीच आपलीशी वाटेल.”
दिग्दर्शक तृशांत इंगळे यांनी सांगितलं किशोर कदम यांनाच का निवडलं?
चित्रपटाचे दिग्दर्शक तृशांत इंगळे यांनीही किशोर कदम यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच त्यांच्या डोळ्यासमोर किशोर कदम असल्याचे त्यांनी सांगितले.
तृशांत इंगळे म्हणतात, “या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यासमोर सुरुवातीपासूनच किशोर कदम हेच होते. कोणतीही व्यक्तिरेखा ते केवळ साकारत नाहीत, तर आपल्या अभिनयातून तिला एक स्वतंत्र ओळख देतात. ‘जिजाई’मधील त्यांची भूमिका ही अत्यंत वास्तववादी आहे. त्यांच्या सहज अभिनयामुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळी उंची मिळाली आहे. त्यांच्यासारखा कसलेला अभिनेता या भूमिकेसाठी मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.”
स्त्रीचा संघर्ष, स्वाभिमान आणि अन्यायाविरोधात उभे राहण्याची तिची ताकद मांडणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांत झळकणार आहेत.
झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्मची निर्मिती असलेला ‘जिजाई’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे रिंकू राजगुरू आणि किशोर कदम यांची हटके जोडी पडद्यावर काय कमाल करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






