
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र हिरवाईचे नयनरम्य चित्र पाहायला मिळत आहे. या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही एका खास उपक्रमासाठी सज्ज झाले आहेत. अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्रीच्या पुढाकारातून ‘झिम्माड’ या विशेष पावसाळी पिकनिकचे आयोजन करण्यात आले असून, ऑगस्ट महिन्यात पुण्याजवळील मॅरीगोल्ड बॅन्क्वेट्सच्या ‘डी लश’ येथे हा मैत्रीसोहळा रंगणार आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात होणाऱ्या या सहलीमध्ये नाच-गाणी, विविध खेळ, गप्पा, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि भरपूर धमाल असा कार्यक्रम असणार आहे. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा विरंगुळा मिळावा आणि कलाकारांना एकमेकांसोबत निवांत वेळ घालवता यावा, या उद्देशाने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
पुष्कर श्रोत्रीच्या आवाहनाला मराठी चित्रपटसृष्टीतील ६० हून अधिक कलाकारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणामुळे एकमेकांना फारसा वेळ न देऊ शकणारे कलाकार या निमित्ताने पुन्हा एकदा पावसाळ्याच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.
या पावसाळी सहलीचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार आशा काळे, लीला गांधी, फैय्याज, मोहन आगाशे, मोहन जोशी तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक राणे यांचा कलाकारांच्या वतीने विशेष कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाला मानाचा मुजरा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना पुष्कर श्रोत्री म्हणाला, “पावसाळा हा प्रत्येकाचाच आवडता ऋतू आहे. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून सगळे कलाकार एकत्र येऊन गप्पा मारणार, गाणी गाणार, नाचणार आणि भरपूर धमाल करणार आहोत. अशा भेटींमुळे मैत्री अधिक घट्ट होते आणि कामाचा ताणही हलका होतो.”
एक दिवसाच्या या सहलीची तयारी अंतिम टप्प्यात असून, यंदापासून ‘झिम्माड’ ही पावसाळी सहल मराठी कलाकारांची वार्षिक परंपरा बनवण्याचा मानस पुष्कर श्रोत्री ने व्यक्त केला आहे. मैत्री, कृतज्ञता, संवाद आणि आनंदाचा संगम घडवणारा हा उपक्रम मराठी मनोरंजनविश्वासाठी एक नवा अध्याय ठरणार आहे.