(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
देवशयनी एकादशीपासून सुरू होणारा पवित्र चातुर्मास हा भक्ती, संयम, आत्मशुद्धी आणि सत्कर्मांचा कालखंड मानला जातो. याच पार्श्वभूमीवर कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘चातुर्मास पर्व’ाची सुरुवात होत असून, या विशेष पर्वात तुळजाईसमोर मोठे दैवी आव्हान उभे राहणार आहे.
कथानकानुसार, भगवान विष्णू योगनिद्रेत जाण्याच्या तयारीत असताना महादेवांचा ठावठिकाणा लागत नाही. त्यामुळे सृष्टीच्या पालनाची महत्त्वाची जबाबदारी आदिशक्तीकडून आई तुळजाभवानीवर सोपवली जाते. भक्तांच्या रक्षणाचा संकल्प करत असतानाच भगवान विष्णू तिला, “तुम्ही मानवी देह धारण केला आहे, या महान दायित्वासाठी पूर्णपणे सिद्ध आहात का?” असा अनपेक्षित प्रश्न विचारतात. या प्रश्नामुळे तुळजाईसमोर नवी कसोटी उभी राहते आणि पुढे नेमकं काय घडणार, याची उत्सुकता वाढते.
दुसरीकडे पाताळातही मोठं कारस्थान रचलं जात आहे. पाताळदेवी ही प्रत्यक्षात अलक्ष्मी असल्याचं उघड होतं. अलक्ष्मी, महिषासुर आणि शुक्राचार्य हे तिघे मिळून भक्तांच्या श्रद्धेला तडा देण्याचा कट रचतात. त्यामुळे तुळजाभवानीसमोर भक्तांचं रक्षण आणि असुरी शक्तींना पराभूत करण्याचं दुहेरी आव्हान उभं राहतं.
याचबरोबर गावातील समांतर कथानकात व्यसनमुक्त झालेला भिक्या आणि समाजाकडून अपशकुनी ठरवली गेलेली त्याची मामेबहीण उषा यांच्या आयुष्यातही मोठे बदल घडतात. गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर तुळजाभवानी ब्रह्मचारिणी रूप धारण करून उषाला गुरू म्हणून स्वीकारते आणि तिला ‘सोळा सोमवार’ व्रताचं महत्त्व समजावून तिच्या आध्यात्मिक प्रवासाला नवी दिशा देते.
भक्ती, श्रद्धा, अध्यात्म आणि असुरी शक्तींविरुद्धचा संघर्ष अशा अनेक रंजक घडामोडींनी सजलेलं ‘चातुर्मास पर्व’ प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणार आहे. तुळजाभवानी भक्तांचं रक्षण कसं करणार, महादेवांच्या ध्यानात आलेलं संकट कसं टळणार आणि असुरांचा डाव कसा हाणून पाडला जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.






