
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Madhuri Dixit: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आजही आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ९० च्या दशकात माधुरीने बॉलिवूडमध्ये मोठं स्टारडम अनुभवलं. मात्र, त्या काळातील कलाकारांचं आयुष्य आणि आजच्या कलाकारांचं आयुष्य यात बराच फरक आहे. याबाबत माधुरीने नुकत्याच ‘कोण होणार करोडपती’ या मराठी क्विझ शोमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिने ९० च्या दशकातील स्टारडम कसं होतं, तसेच आजच्या सोशल मीडिया ट्रोलिंगबद्दलही आपलं मत मांडलं.
‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात काही दिवसांपूर्वी शिव ठाकरे आणि गौतमी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिव ठाकरेने माधुरी दीक्षितला इतकी वर्षे लोकप्रियता टिकवून ठेवतानाही स्वतःला जमिनीवर कसं ठेवलं, असा प्रश्न विचारला. तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगचा तिच्यावर कधी परिणाम झाला का, याबद्दलही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
‘मी ट्रोलिंगकडे कधीच लक्ष दिलं नाही’
शिव ठाकरेच्या प्रश्नाला उत्तर देताना माधुरी म्हणाली की, ९० च्या दशकातही काही मासिकांमधून कलाकारांवर टीका केली जायची. मात्र, त्यावेळची टीका आज सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगइतकी कठोर नव्हती. माधुरीने स्पष्ट केलं की, तिने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच कामाला प्राधान्य दिलं. तिला तिच्या कामाची आवड होती आणि प्रत्येक जबाबदारी तिने प्रामाणिकपणे पार पाडली. त्यामुळे नकारात्मक टीकेकडे तिने कधीच फारसं लक्ष दिलं नाही.
यावेळी माधुरी म्हणाली, “मला माझ्या कामाची आवड होती आणि मी जे काही केले ते खऱ्या मनाने केले. म्हणूनच मी ट्रोलिंगकडे कधीच लक्ष दिले नाही.” कलाकारांनी आपल्या कामावर प्रेम करायला हवं आणि आपले हेतू चांगले ठेवायला हवेत, असंही तिने सांगितलं. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कामाशी प्रामाणिक असते, तेव्हा इतर गोष्टी फारशा महत्त्वाच्या राहत नाहीत, असं मत माधुरीने व्यक्त केलं.
माधुरी दीक्षितने १९८४ मध्ये ‘अबोध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘दिल’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन…!’, ‘दिल तो पागल है’ आणि ‘देवदास’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं. आपल्या अभिनयासोबतच नृत्याच्या अदाकारीनेही माधुरीने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. आजही तिची लोकप्रियता कायम आहे. तिच्या या वक्तव्यामुळे ९० च्या दशकातील आणि आजच्या मनोरंजनविश्वातील बदल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.