
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Harshvardhan Rane: हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता हर्षवर्धन राणे सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी समोर आली आहे. ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या हर्षवर्धनला चित्रपटाचे निर्माते दीपक मुकुट यांनी कोट्यवधी रुपयांची आलिशान लँड रोव्हर डिफेंडर ऑक्टा (Land Rover Defender Octa) SUV भेट दिली आहे. या खास भेटीचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरला. चित्रपटाला मिळालेल्या या प्रतिसादामुळे आनंदी झालेल्या निर्मात्यांनी हर्षवर्धनला ही महागडी SUV भेट दिली. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते दीपक मुकुट यांनी अभिनेत्याला ही खास भेट देऊन आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
हर्षवर्धनने शेअर केले फोटो
हर्षवर्धन राणेने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दीपक मुकुट यांचा उल्लेख ‘वचनाचा पक्का माणूस’ असा केला आहे. तसेच त्यांनी भेट दिलेल्या नव्या लँड रोव्हर डिफेंडर ऑक्टाचे फोटोही शेअर केले आहेत. याशिवाय, आगामी वाढदिवसानिमित्त चाहत्यांसोबत दीपक मुकुट यांच्या कार्यालयाला भेट देऊन ‘सनम तेरी कसम २’ची घोषणा करण्याचा मानसही त्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या सीक्वलबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
किती आहे Defender Octa SUV ची किंमत?
हर्षवर्धनला भेट मिळालेल्या लँड रोव्हर डिफेंडर ऑक्टाची एक्स-शोरूम किंमत सुमारे २.४२ कोटी रुपयांपासून सुरू होते. या गाडीच्या व्हेरिएंटनुसार किंमत सुमारे ३.२५ कोटी रुपयांपर्यंत जाते. ही डिफेंडर मालिकेतील सर्वात शक्तिशाली आणि वेगवान SUV म्हणून ओळखली जाते.
हर्षवर्धन राणेच्या कार कलेक्शनमध्ये आधीपासूनच काही खास गाड्यांचा समावेश आहे. त्याच्याकडे टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही प्रीमियम हायब्रीड एमपीव्ही असून तिची किंमत ३० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय रोड ट्रिप आणि कॅम्पिंगसाठी त्याच्याकडे फोर्स ट्रॅव्हलर कॅम्पर व्हॅन आहे. त्याच्या गॅरेजमध्ये मॉडिफाइड मारुती सुझुकी जिम्नीचाही समावेश आहे. आता कोट्यवधींच्या Defender Octa SUV मुळे त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान गाडीची भर पडली आहे.