
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Akshaya Naik: मालिका, ओटीटी आणि थिएटर अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. अभिनयासोबतच अक्षया सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे आणि ते म्हणजे तिचं क्लाऊनिंग. यंदाचा गणेशोत्सव अक्षयासाठी विशेष ठरला. आपल्या कलेच्या माध्यमातून तिने बाप्पाची सेवा करत मालवणी, मालाड येथील रेड-लाईट एरियातील मुलांसाठी क्लाऊनिंगचे प्रयोग केले.
अक्षया नाईक ‘Clowns Without Borders India’ या संस्थेच्या माध्यमातून सेक्स वर्कर्सची मुलं, रेड-लाईट एरियामध्ये राहणारी मुलं आणि विविध वंचित समुदायांपर्यंत नाटक आणि क्लाऊनिंग पोहोचवण्याचं काम करते.
या उपक्रमाचा उद्देश या मुलांना काही काळ त्यांच्या परिस्थितीपासून दूर नेऊन त्यांच्यासोबत संवाद साधणं आणि कलेच्या माध्यमातून त्यांना आनंदाचे क्षण देणं हा आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात मालवणी, मालाड येथील रेड-लाईट एरियामध्ये काम करणाऱ्या ‘आस्था परिवार’ या NGO सोबत संस्थेने टायअप केला. यानंतर परिसरातील तीन गणपती मंडळांमध्ये जाऊन मुलांसाठी क्लाऊनिंगचे प्रयोग करण्यात आले.
‘माझी कला बाप्पाच्या सेवेत कशी आणू शकते?’
गणेशोत्सवाच्या काळात अनेक कलाकार आपली कला गणपती मंडळांमध्ये ‘सेवा’ म्हणून सादर करतात. हे पाहताना अक्षयाच्या मनातही अनेकदा प्रश्न यायचा की, आपण क्लासिकल डान्स किंवा संगीत शिकलो नसताना आपली कला बाप्पाच्या सेवेत कशी आणायची?
यंदा या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं. लोकांना हसवणं हीसुद्धा एक मोठी सेवा आहे, असं अक्षया मानते. बाप्पाच्या मंडपात उभं राहून आपल्या क्लाऊनिंगचा प्रयोग सादर करता आला, यापेक्षा मोठा आनंद दुसरा नसल्याचं तिने सांगितलं.
या संपूर्ण अनुभवाचं श्रेय अक्षयाने त्यांचे दिग्दर्शक रूपेश टिल्लू आणि सहक्लाऊन अंकिता निकरड यांना दिलं आहे.
मशिदीसमोर गणपतीचा मंडप अन् सगळ्यांचा एकत्र सहभाग
या अनुभवातील आणखी एक विशेष गोष्ट अक्षयाने सांगितली. ज्या परिसरात हे प्रयोग झाले, तो प्रामुख्याने मुस्लिम समुदायाचा परिसर आहे. मात्र ज्या ठिकाणी प्रयोग झाला, तिथे मशिदीच्या अगदी समोर गणपतीचा मंडप होता.
‘आस्था परिवार’सोबत काम करणाऱ्या काही बुरखा परिधान केलेल्या महिला स्वयंसेवक आणि शिक्षिकाही मुलांना घेऊन गणपतीच्या मंडपात आल्या होत्या. या मुलांमध्ये वेगवेगळ्या धर्मांची आणि पार्श्वभूमीची मुलं होती. मात्र त्या क्षणी सगळे एकत्र येऊन या आनंदाचा भाग झाले.
अक्षयाच्या मते, धर्म आणि ओळख बाजूला ठेवून लोक एकमेकांच्या आनंदाचा भाग बनतात, असे अनेक छोटे क्षण आपल्या आजूबाजूला घडत असतात. लोकांना एकत्र आणण्याची ताकद ही कलेची आणि परफॉर्मन्सची खरी शक्ती आहे, असं तिला वाटतं.
मुसळधार पाऊस सुरू झाला, तरी प्रयोग थांबवले नाहीत
या क्लाऊनिंग प्रयोगांदरम्यान अक्षया आणि तिच्या सहकाऱ्यांसमोर आणखी एक आव्हान उभं राहिलं. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाचा आवाज इतका मोठा होता की एकमेकींचे आवाजही ऐकू येत नव्हते. त्यात माइकचीही सुविधा नव्हती.
मात्र या परिस्थितीतही त्यांनी प्रयोग थांबवला नाही. मुलांसाठी सलग तीन प्रयोग सादर करण्यात आले.
प्रयोग संपवून घरी परतताना शरीर थकलं होतं, मात्र मनात वेगळीच ऊर्जा होती, असं अक्षया सांगते. या अनुभवातून तिला पुन्हा एकदा जाणवलं की कला केवळ रंगमंचावर सादर करण्यासाठी नसते.
एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं, समुदायांना जवळ आणणं आणि कोणाच्या आयुष्यात काही क्षणांचा आनंद निर्माण करणं, यासाठीही कलेचा वापर होऊ शकतो.
यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या कलेच्या माध्यमातून बाप्पाच्या चरणी सेवा करता आली, हीच आपल्यासाठी सर्वात सुंदर गोष्ट असल्याचं अक्षया नाईकने सांगितलं.