
गौरव पत्की यांच्या मते, या मालिकेची खरी ताकद तिच्या विस्तृत आणि सखोल कथानकात आहे. जवळपास ५० भागांच्या माध्यमातून अनन्या आणि ऋषी यांच्या आयुष्यातील विविध टप्पे, त्यांचं भावविश्व आणि त्यांच्यातील नात्याची उत्क्रांती दाखवण्याची संधी मिळाली. एखाद्या प्रेमकथेला इतक्या तपशीलवार पद्धतीने उलगडता येणं, हीच या प्रकल्पाची सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचं ते सांगतात. त्यामुळे पात्रांचा प्रवास अधिक वास्तववादी आणि प्रेक्षकांशी जोडणारा झाला आहे.
मालिकेची कथा कॉर्पोरेट जगाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याने गौरव पत्की यांचा वैयक्तिक अनुभवही लेखनासाठी उपयोगी ठरला. त्यांनी काही काळ आयटी क्षेत्रात काम केलं असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक मित्रांमुळे त्या वातावरणातील कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि नातेसंबंधांची गुंतागुंत याची त्यांना आधीपासूनच चांगली जाणीव होती. मात्र, या मालिकेवर काम करताना त्या विश्वाचा आणखी बारकाईने अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे कार्यस्थळी निर्माण होणाऱ्या नात्यांचं वास्तव आणि त्यामागील भावनिक पैलू अधिक प्रभावीपणे कथेत मांडता आले. मालिकेतील अनन्या आणि ऋषी यांच्यातील सहज, नैसर्गिक आणि मनाला भिडणारी केमिस्ट्री प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेणार आहे. याबाबत गौरव पत्की म्हणतात की, याचं खरं श्रेय कलाकारांनाच जातं. लेखक म्हणून त्यांनी फक्त एवढीच काळजी घेतली की दोन्ही कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिरेखांशी आणि त्यांच्या नात्याशी पूर्ण प्रामाणिक राहावं. त्यांच्या मते, पडद्यावर दिसणारी जादू ही कृत्रिम प्रयत्नांतून नव्हे, तर पात्रांशी असलेल्या प्रामाणिक नात्यातून निर्माण होते. त्यामुळे त्या जादूचं गुपित सांगण्यापेक्षा ती अनुभवण्यातच खरी मजा आहे.
या मालिकेचा मूळ संदेशही प्रेमाच्या सकारात्मक शक्तीवर आधारित आहे. गौरव पत्की यांच्या मते, प्रेम ही केवळ भावना नसून ते माणसाला प्रत्येक संकटात आणि प्रत्येक आव्हानात अधिक सक्षम बनवतं. प्रेमामुळे व्यक्ती स्वतः अधिक मजबूत होते आणि दोन व्यक्ती मिळून एक सक्षम टीम म्हणून प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊ शकतात. हाच या मालिकेच्या कथानकाचा गाभा असल्याचं ते स्पष्ट करतात. मराठी प्रेक्षक आणि ZEE5 यांच्यातील नात्याबाबत बोलताना गौरव पाटकी यांनी सांगितलं की, त्यांच्या लहानपणापासून झी हा त्यांच्या कुटुंबाच्या मनोरंजनाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. आज ZEE5 ही त्याच परंपरेची आधुनिक आवृत्ती असून, अनेक पिढ्या या व्यासपीठावरील दर्जेदार आशय पाहत मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे ऋषी आणि अनन्याची ही समकालीन प्रेमकथा मराठी प्रेक्षकांना नक्कीच आपलीशी वाटेल, असा त्यांचा विश्वास आहे.
ते पुढे सांगतात की, ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही मालिका फक्त तरुण किंवा Gen Z प्रेक्षकांसाठी नाही. उलट सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना जोडून ठेवण्याची क्षमता या कथेत आहे. आजच्या तरुणांच्या विचारसरणी, त्यांच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आधुनिक आयुष्याचा वेग समजून घेण्यासाठी पालकांच्या पिढीलाही ही मालिका उपयुक्त ठरेल. तर प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची गोड आठवण पुन्हा अनुभवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा प्रवास खास ठरणार आहे. आधुनिक नातेसंबंध, कॉर्पोरेट जीवनातील वास्तव, भावनिक गुंतागुंत आणि प्रेमाची प्रेरणादायी ताकद यांचा सुंदर संगम घडवणारी ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही मालिका प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच देणार नाही, तर नात्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधीही देईल, असा विश्वास गौरव पत्की यांनी व्यक्त केला.