
Jay Jay Swami Samarth : मंदिरात प्रवेश नाकारला, पण स्वामींचं दिव्य दर्शन घडलं! शंकर-रुहीला अलौकिक अनुभूती
Jay Jay Swami Samarth : मंदिराच्या दारातून माघारी फिरावे लागले, तरी भक्तांची श्रद्धा कमी होत नाही, हा स्वामी समर्थांचा विचार ‘कलर्स मराठी’वरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. शंकर आणि रुही या नवविवाहित जोडप्याला सामाजिक भेदभावामुळे महादेव मंदिरात प्रवेश नाकारला जातो. मात्र, स्वामींच्या कृपेने त्यांना मंदिराबाहेरच अलौकिक दर्शनाची अनुभूती मिळणार आहे. मालिकेचे हे विशेष भाग 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी रात्री 8.10 वाजता प्रसारित होणार आहेत.
मालिकेतील कथेनुसार, गावातील सामाजिक भेदभाव आणि जुनाट विचारांमुळे शंकर-रुही या जोडप्याला त्यांच्या प्रेमविवाहाचे कारण देत महादेव मंदिरात प्रवेश नाकारला जातो. मार्तंड आपल्या कपटी कारस्थानातून दोघांचा अपमान करतो. एवढेच नव्हे, तर स्वामींच्या भक्तांना आणि त्यांच्या विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. देवदर्शनासाठी आसुसलेल्या या जोडप्याला मंदिराच्या दारातूनच अपमानित होऊन माघारी फिरावे लागते.
मात्र, स्वामींच्या शिकवणीनुसार परमेश्वर केवळ मंदिराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त नसतो, तर तो चराचरात आणि प्रत्येक जीवामध्ये वास करतो. हीच जाणीव शंकर आणि रुहीला करून देण्यासाठी स्वामी त्यांना एका अनोख्या अनुभूतीची प्रचिती देतात. जगण्यासाठी हवा जशी सर्वत्र उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे परमेश्वरही सर्वत्र व्यापलेला आहे, असा संदेश स्वामी या प्रसंगातून देतात.
स्वामींच्या चरणी श्रद्धेने अभिषेक सुरू असताना बेलपत्रातून दिव्य प्रकाश प्रकट होतो. क्षणार्धात शंकर आणि रुहीला स्वामींच्या रूपात दिव्य साक्षात्कार घडतो. या अलौकिक दर्शनाने दोघेही भारावून जातात. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात आणि स्वामींच्या कृपेने त्यांच्या श्रद्धेला जणू पूर्णत्व मिळते.
दुसरीकडे, स्वामींच्या या दिव्य लीलेनंतरही मार्तंडाचे कारस्थान थांबलेले नाही. शंकरला कामाच्या निमित्ताने जाळ्यात अडकवण्यापासून ते त्याची आणि रुहीची बदनामी करण्यापर्यंत त्याने नवा डाव आखला आहे. स्वामींच्या विचारांचा दीप विझवण्यासाठी मार्तंड आता कोणती खेळी खेळणार? आपल्या भक्तांच्या मदतीला स्वामी कोणत्या रूपात धावून येणार? शंकर आणि रुहीची महादेव दर्शनाची इच्छा पूर्ण होणार का? या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागांतून उलगडणार आहेत.
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील हे विशेष भाग 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी रात्री 8.10 वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहेत.
Ans: मालिकेचे विशेष भाग 14 आणि 15 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसारित होणार आहेत.
Ans: त्यांच्या प्रेमविवाहामुळे गावातील सामाजिक भेदभाव आणि जुनाट विचारांमधून त्यांना महादेव मंदिरात प्रवेश नाकारला जातो.
Ans: स्वामींच्या चरणी अभिषेक सुरू असताना बेलपत्रातून दिव्य प्रकाश प्रकट होतो. या प्रसंगात दोघांना स्वामींच्या दिव्य दर्शनाची अनुभूती मिळते.