
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
यशवंत पानसरे हे एकेकाळी प्रबळ वकील असतात. मात्र, आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे त्यांचं आयुष्य बदलून जातं. स्वतःवरील विश्वास गमावलेले पानसरे वकिलीपासून दूर जात नोटरी म्हणून काम करू लागतात. अपराधीपणा आणि आत्मसंशयाच्या गर्तेत अडकलेल्या यशवंत यांच्यासमोर एक दिवस सदाशिव मापारी येतात. बेपत्ता झालेल्या आपल्या मुलीचा, अलकाचा शोध घेण्यासाठी ते यशवंत यांची मदत मागतात. मात्र, सुरुवातीला यशवंत त्यांना नकार देतात.
यानंतर कथेला अनपेक्षित वळण मिळतं. न्यायालयाबाहेर सदाशिव स्वतःला पेटवून घेतात. या घटनेचा यशवंत यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. स्वतःवरील विश्वास हरवलेला हा माणूस पुन्हा न्यायासाठी उभा राहण्याचा निर्णय घेतो. यशवंत जनहित याचिका दाखल करतात आणि या लढाईत त्यांना जान्हवी या निर्भय तरुण वकिलाची साथ मिळते. इथून सुरू होतो सत्याचा शोध आणि व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष.
सत्याच्या शोधात राजकीय शक्तींशी संघर्ष
अलका बेपत्ता होण्यामागील रहस्य उलगडत असताना कथानक न्यायालयापुरतं मर्यादित राहत नाही. पुरावे गोळा करणं, वेगवेगळे धागे जोडणं आणि या प्रकरणामागील शक्तींचा शोध घेणं, या सगळ्यांतून यशवंत यांचा संघर्ष अधिक गुंतागुंतीचा बनतो.
राजकीय शक्तींचा प्रभाव आणि न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीची हतबलता यांच्यातील संघर्ष सीरिजमध्ये पाहायला मिळतो. काही वेळा सत्य समोर आणण्यापेक्षा ते दडपण्याचे प्रयत्न अधिक प्रभावी ठरत असल्याचं चित्र उभं राहतं. या प्रकरणाची जबाबदारी यशवंत यांच्या माथी मारण्याचाही प्रयत्न होतो. मात्र, ते या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पाठपुरावा सोडत नाहीत.
अलकाचा शोध घेताना यशवंत यांना केवळ एका बेपत्ता मुलीचं रहस्य उलगडायचं नसतं, तर स्वतःची वकील म्हणून हरवलेली ओळखही पुन्हा मिळवायची असते. त्यांच्या या प्रवासात जान्हवीची साथ महत्त्वाची ठरते. अखेर अलकाबाबतचा एक महत्त्वाचा धागा सापडतो; मात्र पुढे नेमकं काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी सीरिज पाहावी लागेल.
कलाकारांचा अभिनय चांगला; पण कथानक किती खिळवून ठेवतं?
सीरिजमधील कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. भरत जाधव यांच्या व्यक्तिरेखेतील अंतर्गत संघर्ष आणि पुन्हा उभं राहण्याची धडपड कथेला भावनिक बाजू देतात. पुष्कर श्रोत्री यांची व्यक्तिरेखाही कथानकातील संघर्षाला वेगळा आयाम देते. इतर कलाकारांची उपस्थिती कथेला आवश्यक आधार देते.
मात्र, कलाकारांचा अभिनय चांगला असूनही कथानक प्रेक्षकांना सातत्याने खिळवून ठेवण्यात काही ठिकाणी कमी पडतं. काही प्रसंगांमध्ये सीरिज एखाद्या दैनंदिन मालिकेसारखी वाटते. तपासाच्या प्रक्रियेतून थरार निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो, तर काही वेळा कोर्टरूम ड्रामावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे तपासाधारित थरार आणि न्यायालयीन नाट्य यांचा मेळ काही ठिकाणी विस्कळीत वाटतो.
भूतकाळातील अपराधीपणा आणि वर्तमानातील न्यायालयीन युक्तिवाद यांमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे कथानकाला वेगवेगळे स्तर मिळतात; मात्र प्रेक्षकांना शेवटपर्यंत उत्सुक ठेवण्यासाठी आवश्यक असलेला ताण प्रत्येक प्रसंगात टिकून राहत नाही.
या कोर्टरूम ड्रामामध्ये अभिनेता भरत जाधव यशवंत पानसरे यांच्या प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, शिवानी रांगोळे, शर्वरी जमेनीस, उज्ज्वला जोग, विद्याधर जोशी आणि मिलिंद फाटक यांसारख्या कलाकारांची फळी पाहायला मिळते. प्रत्येक पात्राभोवती कथानकाचे वेगवेगळे धागे गुंफले गेले आहेत.
पुष्कर श्रोत्री यांनी सारडा या वकिलाची भूमिका साकारली आहे. व्यवस्थेची कार्यपद्धती आणि तिच्यामागे असलेल्या शक्तींची जाणीव असलेल्या या व्यक्तिरेखेचा यशवंत पानसरे यांच्याशी होणारा संघर्ष कथेला वेगळं वळण देतो. तर शर्वरी जमेनीस यशवंत यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसतात. उज्ज्वला जोग यांनी त्यांच्या सासूची, तर मिलिंद फाटक यांनी सदाशिव मापारी यांची भूमिका साकारली आहे.
पाहावी की नाही?
‘कोण यशवंत पानसरे?’ ही वेबसिरीज न्याय, सत्ता, राजकीय प्रभाव आणि स्वतःवरील विश्वास पुन्हा मिळवण्याच्या संघर्षावर भाष्य करते. भरत जाधव आणि इतर मराठी कलाकारांचा अभिनय ही सीरिजची जमेची बाजू आहे. मात्र, कोर्टरूम ड्रामा आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर यांचा अधिक प्रभावी मेळ साधता आला असता, असं वाटतं.
न्यायालयीन संघर्ष आणि तपासाधारित कथानक पाहायला आवडणाऱ्या प्रेक्षकांना ही सीरिज एकदा पाहता येईल. मात्र, सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेगवान आणि उत्कंठावर्धक थराराची अपेक्षा असेल, तर काही भाग अपेक्षेइतके प्रभावी वाटणार नाहीत.