
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Chinmayi More: नवरात्रीचा सण म्हणजे शक्ती, धैर्य आणि स्त्रीत्वाचा उत्सव. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. मात्र, देवीची शक्ती केवळ मंदिरातील मूर्तीपुरती मर्यादित नसून आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीमध्येही असते. आईच्या मायेपासून ते स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्त्रीच्या जिद्दीपर्यंत, अनेक रूपांत स्त्रीशक्तीचं दर्शन घडतं. याच स्त्रीशक्तीविषयी झी मराठीवरील ‘धाकट्या सुनबाई’ या मालिकेत राधिकाची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री चिन्मयी मोरे हिने आपले विचार मांडले आहेत. यावेळी तिने आपल्या यशामागे आईचा असलेला मोलाचा वाटा भावनिक शब्दांत व्यक्त केला.
नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीविषयी बोलताना चिन्मयी मोरे म्हणाली की, शक्ती केवळ देवीच्या मूर्तीत नसते, तर ती प्रत्येक स्त्रीच्या मनात, विचारांत आणि कर्तृत्वातही असते. स्त्री आपल्या आयुष्यात मुलगी, पत्नी, आई, बहीण अशा अनेक भूमिका समर्थपणे निभावत असते. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी स्वतःसह आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याची ताकद म्हणजे खरी स्त्रीशक्ती, असं तिला वाटतं.
आजच्या काळात प्रत्येक स्त्रीने सर्वप्रथम स्वतःवरचा विश्वास जपायला हवा, असंही चिन्मयीने सांगितलं. स्वप्नांना पंख देणारा आत्मविश्वास, निर्णयांना बळ देणारा आत्मसन्मान आणि संकटांचा सामना करण्याचं धैर्य हीच स्त्रीची खरी ताकद आहे. इतरांच्या सावलीत उभं राहण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या कर्तृत्वातून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असा संदेशही तिने दिला.
“स्वप्नांना ध्येय बनवा आणि जिद्दीने पुढे चला”
आपल्या मनात एखादं स्वप्न असेल, तर ते केवळ मनातच ठेवू नका, तर त्याला ध्येय बनवून ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने पुढे जा, असं आवाहन चिन्मयीने मुली आणि महिलांना केलं. तिच्या मते, स्वतःवर विश्वास ठेवणं हीच आपल्यातील देवीशक्तीची पहिली पायरी आहे.
स्वतःच्या प्रवासाविषयी बोलताना चिन्मयी म्हणाली की, स्वप्न पाहण्यापासून ते आज पडद्यावर प्रमुख भूमिका साकारण्यापर्यंतचा तिचा प्रवास मेहनत, विश्वास आणि अनेक छोट्या-छोट्या प्रयत्नांतून घडला आहे. अपयश आलं तरी थांबू नये आणि यश मिळालं तरी जमिनीशी जोडलेलं राहावं, असंही तिने सांगितलं.
“माझ्या यशामागे आईची जिद्द आणि संस्कार”
चिन्मयीच्या या प्रवासात तिच्या आईचा मोठा वाटा आहे. लहानपणापासून आईनेच तिला वाढवलं आणि प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे साथ दिली. तिच्या आईने चिन्मयीच्या स्वप्नांना स्वतःच्या स्वप्नांसारखं जपलं. त्यामुळे आज ती ज्या ठिकाणी आहे, तिथे पोहोचण्यामागे आईची जिद्द, त्याग आणि संस्कार असल्याची भावना तिने व्यक्त केली.
आईने तिला घडवताना अनेकदा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या; मात्र तिच्या स्वप्नांसाठी कधीही कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे आपल्या यशाकडे पाहताना आईच्या संघर्षाची जाणीव अधिक तीव्रतेने होते, असं चिन्मयीने सांगितलं.
आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणाली, “माझ्या यशाच्या प्रकाशामागे आईने जपलेली एक छोटीशी ज्योत आहे!” तिच्या या शब्दांतून आईविषयीचं प्रेम, कृतज्ञता आणि तिच्या संघर्षाची जाणीव स्पष्टपणे दिसून येते.
चिन्मयी मोरेच्या विचारांतून स्त्रीशक्तीचा खरा अर्थ अधोरेखित होतो. स्वतःच्या स्वप्नांसाठी संघर्ष करणारी स्त्री असो किंवा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी आई, प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळी शक्ती असते. नवरात्रीच्या या पवित्र पर्वावर देवीच्या शक्तीला वंदन करतानाच आपल्या आयुष्यात प्रेम, धैर्य आणि जिद्दीने प्रकाश फुलवणाऱ्या प्रत्येक स्त्रीलाही सलाम करण्याचा संदेश चिन्मयीने दिला आहे.