
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Marathi Actress Madhavi :काही कलाकार आपल्या अभिनयासोबतच साध्या राहणीमानामुळेही प्रेक्षकांची मने जिंकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अभिनेत्री माधवी कोकणातील आपल्या गावी, गुहागर येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यावेळी तिने स्वतःच्या हाताने घराची जमीन शेणाने सारवली आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.
माधवीने गुहागरमधील आपल्या घरात अगदी पारंपरिक पद्धतीने शेणाने जमीन सारवली. विशेष म्हणजे, जमीन सारवल्यानंतर तिने त्यावर सुंदर रांगोळीही काढली. हा खास क्षण तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांनी तिच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.
“कलाकार होण्याआधी मी कोकणातली एक सामान्य घरातली मुलगी”
हा व्हिडीओ शेअर करत माधवीने कोकणातील आपल्या आठवणी आणि गावाशी असलेले नाते व्यक्त केले. तिने लिहिले, “कोकणच्या मातीचा सुगंध आणि गावाकडच्या परंपरा! गुहागरला आल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं. मग अगदी प्रसन्न होते! हातानं जमीन सारवण्याचा हा अनुभव म्हणजे आपल्या मुळांशी जोडणारा एक सुंदर क्षण! खरं सांगायचं तर, कलाकार होण्याआधी मी कोकणातल्या एका सामान्य घरातली मुलगी आहे. आजीला मदत करणं, गावातलं वातावरण जगणं, आपली संस्कृती आणि परंपरा जपणं, गावच्या मातीचा सुगंध अनुभवणं… या सगळ्या गोष्टींमुळे मला मनापासून आनंद मिळतो.”
पुढे ती म्हणाली, “गुहागरला किंवा कोकणात गेल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं. तिथे गेल्यावर मी एक कलाकार म्हणून नसते, तर फक्त माझ्या मातीशी जोडलेली एक साधी रहिवासी असते. मी जे काही केले त्यात खरं तर नवल काहीच नाही.”
माधवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘अभिमान आहे की तुम्ही अजूनही आपल्या मातीशी जोडलेले आहात’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतरही आपल्या गावाशी, संस्कृतीशी आणि परंपरांशी जोडलेले राहण्याचा माधवीचा हा अंदाज चाहत्यांना विशेष भावला आहे.