
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Marathi Singer: गणपती म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो कोकण. कोकणातील गणेशोत्सवाची मजाच काही और असते. काही दिवसांपूर्वीच राज्यभरात लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह कोकणातील गावी जातात. यंदाही अनेक मराठी कलाकारांनी आपल्या गावी जाऊन गणेशोत्सव साजरा केला. अशातच एका मराठी गायिकेने कोकणातील गणेशोत्सवाची खास झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विशेष म्हणजे, गणपती विसर्जनाच्या वेळी ही गायिका चक्क साडी नेसून नदीत पोहताना दिसली.
मराठी संगीतविश्वातील प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन सध्या सोशल मीडियावर कोकणातील गणेशोत्सवाची झलक दाखवत आहे. मुग्धा आणि प्रथमेश लघाटे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. गणपती विसर्जनाच्या वेळचा एक खास व्हिडीओ मुग्धाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये मुग्धा पारंपरिक साडी नेसून नदीत मनसोक्त पोहताना दिसत आहे. विशेष म्हणजे, गणपती विसर्जनाच्या वेळी तिने आरवलीच्या नदीत पोहण्याचा आनंद घेतला. तिचा हा व्हिडीओ प्रथमेशने शूट केला आहे.
‘साडी नेसून नदीत पोहोले’, मुग्धाने सांगितला अनुभव
मुग्धाने हा व्हिडीओ शेअर करताना आपल्या या खास अनुभवाबद्दल लिहिलं आहे. विहिरीत पोहण्याची सवय असल्याचं सांगत तिने यावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहल्याचं म्हटलं आहे. तसेच, हा तिच्यासाठी एक नवा अनुभव असल्याचंही तिने आपल्या पोस्टमधून सांगितलं.
मुग्धाच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. तिच्या या अनोख्या अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. दोघेही एकत्र गायनाचे कार्यक्रम करताना दिसतात.
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या माध्यमातून मुग्धा आणि प्रथमेश यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली आणि पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. आता दोघेही आपल्या संगीताच्या प्रवासासोबतच वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात.