
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
पुण्यातील प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांमध्ये ‘कलावंत’ ढोलताशा पथकाचाही समावेश आहे. या पथकात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी होताना दिसतात. अभिनेत्री श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सौरभ गोखले यांच्यासह अनेक कलाकारांचे ढोल-ताशा वादनाचे फोटो आणि व्हिडीओ गणेशोत्सवादरम्यान सोशल मीडियावर चर्चेत असतात. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘कलावंत’ पथकाच्या वादनाचे व्हिडीओ यापूर्वीही समोर आले आहेत.
दरम्यान, याच ‘कलावंत’ ढोलताशा पथकाबाबत अभिनेते विद्याधर जोशी यांनी सोशल मीडियावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या पोस्टनंतर या पथकाचा भाग असलेल्या अभिनेत्री श्रुती मराठे यांनी कमेंट करत त्यांना थेट उत्तर दिलं. त्यामुळे दोन्ही कलाकारांच्या सोशल मीडिया संवादाची चर्चा रंगली.
विद्याधर जोशी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ‘कलावंत’ पथकातील कलाकारांच्या वादनाबाबत दोन प्रश्न उपस्थित केले. विसर्जन मिरवणुकीत हे कलाकार प्रत्यक्षात किती वेळ वादन करतात आणि सोशल मीडियावरील रील्समध्ये ज्या जोशात ते वादन करताना दिसतात, त्याच जोशात ते सतत वादन करतात का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
श्रुती मराठेने दिलं थेट उत्तर
विद्याधर जोशींच्या पोस्टवर श्रुती मराठे यांनी कमेंट करत त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की, पथकातील कलाकार सुमारे दीड महिना सराव करतात. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत १४ वेळा वादन केलं जातं, तर शेवटच्या दिवशी जवळपास साडेसात तासांची विसर्जन मिरवणूक असते.
‘आम्हाला वादन करायला मनापासून आवडतं’, असं सांगतानाच श्रुती मराठे यांनी वादनाबाबत शंका असल्यास पुढच्या वर्षी प्रत्यक्ष येऊन पाहण्याचं आवाहनही केलं. याचवेळी त्यांनी, ‘घरी बसून फेसबुकवर टाकून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत’, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.
‘माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे…’
श्रुती मराठे यांच्या कमेंटनंतर विद्याधर जोशी यांनीही त्यांना उत्तर दिलं. श्रुतीच्या कमेंटमधील पहिल्या तीन ओळींमध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचं त्यांनी म्हटलं.
तसंच, ‘माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे’, असं सांगत प्रत्यक्ष येऊन पाहण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. वादन करणाऱ्यापेक्षा ते ऐकणाऱ्या किंवा पाहणाऱ्याला अधिक त्रास होऊ शकतो, हा आपला वैयक्तिक अनुभव असल्याचं त्यांनी नमूद केलं.
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आपले प्रश्न केवळ रील्स पाहिल्यामुळे पडले होते आणि प्रत्यक्ष वादन पाहिलेलं नव्हतं, हेही विद्याधर जोशी यांनी स्पष्ट केलं. फेसबुकवर प्रश्न विचारल्यानंतर श्रुती मराठे यांनी त्याला उत्तर दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच, ‘तुला माझा राग आला असेल तर ते योग्यच आहे’, असंही त्यांनी आपल्या कमेंटमध्ये म्हटलं.
दरम्यान, श्रुती मराठे आणि विद्याधर जोशी यांच्यातील हा संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीला प्रश्न उपस्थित करणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठे यांनी आपल्या पथकाच्या सराव आणि वादनाबाबत सविस्तर माहिती देत उत्तर दिलं. त्यानंतर विद्याधर जोशी यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत श्रुती यांच्या उत्तराबद्दल आभार मानले.