
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Star Pravah Serial: ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी अर्जुनवर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता अर्जुनच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी सायली करत असलेले प्रयत्न आणि त्यानंतर घडणारा एक भावुक प्रसंग आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
अर्जुन रुग्णालयात असताना सायलीसमोर अनेक प्रश्न उभे राहिले होते. गरोदर असतानाही सायलीने जिद्द सोडली नाही. तिने संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतः केला आणि महिपतविरोधात महत्त्वाचे पुरावे शोधून काढले. एवढंच नाही तर स्वतःची केस स्वतः लढण्याचा निर्णयही तिने घेतला.
या कठीण काळात अर्जुन रुग्णालयातूनही सायलीला शक्य ती मदत करताना दिसला.
अर्जुन पुन्हा व्हिलचेअरवर
दरम्यान, अर्जुन घरी परतल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झालेली नसते. तो दिवसभर व्हिलचेअरवरच असतो. आपल्या नवऱ्याला पुन्हा पहिल्यासारखं ठणठणीत पाहण्यासाठी सायली निर्धार करते.
घरात बाप्पाचं आगमन झाल्यानंतर सायली देवासमोर हात जोडून प्रार्थना करते. “बाप्पा, हे पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभे राहू देत,” अशी मनापासून इच्छा ती व्यक्त करते.
आगामी भागातील सर्वात भावुक प्रसंग यानंतर घडतो. सायली जाणूनबुजून आपल्या साडीचा पदर पेटत्या दिव्याजवळ नेते आणि तिच्या पदराला आग लागते. घराच्या दरवाजात व्हिलचेअरवर बसलेल्या अर्जुनचं लक्ष सायलीच्या पेटलेल्या पदराकडे जातं.
अर्जुन सायलीला वाचवण्यासाठी जोरात ‘बायको!’ अशी हाक मारतो. मात्र, सायलीपर्यंत त्याचा आवाज पोहोचत नाही. तिला वाचवण्यासाठी अर्जुन व्हिलचेअरवरून उठण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला कसाबसा सावरत तो सायलीपर्यंत पोहोचतो आणि तिच्या पदराची आग विझवतो.
सायलीने स्वतःला अशा धोक्यात का टाकलं, यामुळे अर्जुन तिच्यावर प्रचंड चिडतो. मात्र, सायलीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. कारण ज्या क्षणाची ती आतुरतेने वाट पाहत होती, तो क्षण अखेर तिच्यासमोर आलेला असतो.
सायलीच्या जीवाला धोका दिसताच अर्जुन व्हिलचेअरवरून उठून स्वत:च्या पायावर उभा राहतो. त्यामुळे आपल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याचं पाहून सायली भावुक आणि आनंदी होते.
मुलाला स्वत:च्या पायावर उभं पाहून कल्पनाही खूश
अर्जुनला पुन्हा स्वत:च्या पायावर उभं राहिलेलं पाहून कल्पनालाही मोठा आनंद होतो. आपल्या मुलाला पुन्हा चालताना पाहून कुटुंबासाठी हा क्षण भावुक करणारा ठरतो.
सायलीच्या जिद्दीमुळे आणि अर्जुनच्या सायलीवरील प्रेमामुळे हा क्षण मालिकेतील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आता अर्जुनच्या प्रकृतीत पुढे किती सुधारणा होते आणि सायली-अर्जुनच्या आयुष्यात पुढे कोणतं नवं संकट येतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.