( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Gaurav More Meets Abhijeet Sawant: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता गौरव मोरे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आपल्या आयुष्यातील खास क्षण, शूटिंगचे अपडेट्स आणि कलाकारांसोबतच्या भेटींचे फोटो-व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. सध्या गौरव सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असला तरी सोशल मीडियावर तो सक्रिय आहे.
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता जॉनी लिव्हर यांनी गौरव मोरेच्या घरी भेट दिली होती. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता गणेशोत्सवानिमित्त गौरवने लोकप्रिय गायक अभिजीत सावंत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, गौरवची अभिजीत सावंतसोबत ही पहिलीच भेट आहे.
अभिजीत सावंत हा भारताचा पहिला ‘इंडियन आयडॉल’ ठरला. शो जिंकल्यानंतर त्याने ‘आपका अभिजीत सावंत’ हा म्युझिक अल्बम रिलीज केला. या अल्बमला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातील ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झालं आणि आजही अनेकांच्या आवडीचं आहे.
अभिजीत सावंतला एकदा तरी भेटावं, अशी अनेक चाहत्यांची इच्छा असते. गौरव मोरेचंही हे स्वप्न होतं. तब्बल २१ वर्षांनंतर गौरवची ही इच्छा पूर्ण झाली असून, अभिजीतसोबत झालेली भेट त्याच्यासाठी खास ‘फॅन मोमेंट’ ठरली आहे.
गौरव मोरेने अभिजीत सावंतसोबतच्या भेटीचे काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. गौरवने लिहिलं, “हॅलो मित्रांनो, आज मी कोणाला भेटणार आहे माहिती आहे का? मला किती आनंद होतोय, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण माझ्यासाठी ही फॅन मुमेंट आहे. खरंतर, त्या व्यक्तीला भेटणं हे ९०s मधल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. या क्षणाची मी तब्बल २१ वर्षे वाट पाहिली.”
पुढे त्याने लिहिलं, “तर आपण भेटणार आहोत.. पहिला Indian Idol असलेल्या अभिजीत सावंत दादांना. पहिल्यांदाच भेट झाली… खूप खूप प्रेम दादा आणि ही भेट अंकित प्रभू तुमच्यामुळे शक्य झाली. अभिजीत सर लव्ह यू!”
View this post on Instagram
गौरवने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून दोन्ही कलाकारांवर प्रेम व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे, अभिजीत सावंतनेही गौरवच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत “तुला भेटून मलाही खूप आनंद झाला” असं म्हटलं आहे.
याशिवाय एका चाहत्याने, “अप्रतिम गौरव… इतका सुंदर क्षण तू आमच्याबरोबर शेअर केलास”, अशी कमेंट केली आहे. तर इतर नेटकऱ्यांनी “खूप भारी”, “तुम्ही दोघंही खूप छान आहात”, “अभिजीत दादा कमालच आहेत” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गौरव मोरे आणि अभिजीत सावंत यांची ही पहिली भेट सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याचं स्वप्न तब्बल २१ वर्षांनंतर पूर्ण झाल्याचा आनंद गौरवने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.






