
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
मालिकेतील प्रमुख कलाकारांची माहिती समोर आल्यानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची झलक दाखवणारा प्रोमो झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एका ज्येष्ठ अभिनेत्रीची झलक पाहायला मिळते. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “चाल तिची अंगार, नजरेची तलवार, Swag तिचा बाणेदार… झी मराठीवर येतेय गोष्ट दमदार!”
या प्रोमोमधील अभिनेत्री नेमकी कोण, याचा अंदाज प्रेक्षकांना लावायचा होता. मात्र, प्रोमो समोर येताच नेटकऱ्यांनी या अभिनेत्रीला ओळखल्याचं पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून उषा नाडकर्णी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रोमोवर अभिनेत्री मेघा धाडे हिनेही खास कमेंट केली आहे. मेघाने उषा नाडकर्णींसाठी प्रेमाने ‘आऊ’ अशी कमेंट केली. त्यामुळे प्रोमोमध्ये दिसणारी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीच असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
उषा नाडकर्णी ‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. आता झी मराठीच्या नव्या प्रोमोमुळे या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.
उषा नाडकर्णी या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांच्या दमदार व्यक्तिरेखांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ‘धाकट्या सूनबाई’मध्ये त्यांची भूमिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
दरम्यान, उषा नाडकर्णींच्या एन्ट्रीचा अधिकृत प्रोमो अद्याप समोर आलेला नसून, त्यांची भूमिका आणि व्यक्तिरेखेचं नावही अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही. त्यामुळे आता झी मराठीकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेची प्रेक्षक वाट पाहत आहेत.