
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Udta Teer Movie Review: मुंबई, आकाश जायसवाल: कधी कधी एखादा सिनेमा येतो आणि आयुष्याला फार सिरियसली घेऊ नका, असा मस्त कानमंत्र देऊन जातो. ‘उडता तीर’ हा त्यातलाच एक धमाल मनोरंजक सिनेमा! ओळखींचा घोळ, भन्नाट प्रसंग आणि अनपेक्षित वेळी चेहऱ्यावर हसू आणणारे डायलॉग्स यांची यात जबरदस्त भट्टी जमली आहे. दिग्दर्शक आकाश ए. कौशिक यांनी एका भन्नाट कल्पनेला कॉमेडीचा तडका देत प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मस्त मेजवानी तयार केली आहे. नवराष्ट्रने या चित्रपटाला ३.५ स्टार्स दिले आहेत; हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा!
कहाणी फिरते एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याभोवती. भारतात झालेल्या अपघातानंतर त्याची स्मरणशक्ती जाते आणि तो स्वतःला भारतीय काउंटर इंटेलिजन्स अधिकारी समजू लागतो. मग काय, गैरसमजांची साखळी सुरू होते आणि त्यातून जन्माला येतात एकापेक्षा एक भन्नाट प्रसंग! अगदी छोट्या छोट्या गोष्टींतूनही विनोद शोधण्याची लेखनाची हातोटी इथे पाहायला मिळते. अनेक डायलॉग्स तर हसवण्याचं काम चोख बजावतात. त्यात पार्श्वसंगीताचीही मोलाची साथ मिळते. केवळ शांतता भरून काढण्यापेक्षा कॉमेडीची टाइमिंग आणखी खुलवण्याचं काम ते करतं.
आयुष्मानचा कॉमिक अंदाज, एकदम झक्कास!
आयुष्मान खुराना आपल्या नैसर्गिक चार्म आणि अफलातून कॉमिक टाइमिंगच्या जोरावर व्यक्तिरेखेत रंग भरतो. त्याचा गोंधळलेला अवतार पाहताना प्रेक्षकांचीही हसता हसता पुरेवाट होते. सारा अली खान आपल्या फ्रेश अंदाजाने कथेत रंगत आणते, तर बाकीची स्टारकास्टही मनोरंजनाचा तडका कायम ठेवते. राम कपूर, राहुल बोस आणि गुलशन ग्रोव्हर आपल्या व्यक्तिरेखांमधून सिनेमाचा भन्नाट मूड आणखी रंगतदार करतात. दिवंगत मुकुल देव यांची उपस्थितीही लक्षात राहण्यासारखी आहे.
सिनेमाची एक छोटीशी अडचण म्हणजे उत्तरार्धात काही ठिकाणी गाडी थोडी रेंगाळते. काही प्रसंगांना कात्री लावली असती, तर कॉमेडीचा पंच आणखी जोरदार बसला असता. मात्र, कलाकारांचा दमदार अभिनय, खुमासदार संवाद आणि भन्नाट कथानक यामुळे सिनेमा एकूणच मनोरंजक ठरतो.
अंतिम निकाल
फक्त डोक्याला जास्त ताप न देता निवांत बसून हसायचं असेल, तर ‘उडता तीर’ हा चांगला पर्याय आहे. कथानक काही ठिकाणी थोडं ताणलं जात असलं, तरी विनोद आणि कलाकारांचा अभिनय ही कसर बऱ्याच अंशी भरून काढतात. आयुष्मान खुरानाच्या नेतृत्वाखाली हा सिनेमा हास्याचे भरपूर डोस देतो आणि हलक्याफुलक्या मनोरंजनाची छान ट्रीट ठरतो!