( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Video Viral: पाकिस्तानमध्ये १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच सेलिब्रेशनदरम्यानचा पाकिस्तानी अभिनेत्रींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रींच्या हातात पाकिस्तानचा ध्वज दिसत आहेत, तर पार्श्वभूमीवर भारतीय देशभक्तीपर गाणं वाजत आहे. त्यामुळे या अभिनेत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. त्यांच्या हातात पाकिस्तानचे झेंडे आहेत. मात्र, या सेलिब्रेशनसाठी वापरण्यात आलेल्या गाण्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
पार्श्वभूमीवर ‘ए वतन मेरे वतन’ हे गाणं ऐकायला येत आहे. हे गाणं आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या ‘राझी’ चित्रपटातील आहे. त्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्रींच्या या सेलिब्रेशनवर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
View this post on Instagram
या व्हिडीओवर एका पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरनेही प्रतिक्रिया दिली आहे. सार्वजनिक व्यक्ती म्हणून अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही शेअर करताना अधिक काळजी घ्यायला हवी, असं तिने म्हटलं आहे.
एका व्हिडीओमध्ये इन्फ्लुएन्सर म्हणाली, “चित्रपटातील हे गाणं पाकिस्तानविरोधी होतं. हे चालणार नाही. तुम्हाला हे कळायला हवं. तुम्ही इतक्या ज्येष्ठ अभिनेत्री आहात. आमची खिल्ली उडवली जात आहे. भारतीयसुद्धा आमची खिल्ली उडवतील. मी भारतीय व्लॉगर्सचे रील्स पाहिले आहेत; ते आमची खिल्ली उडवत आहेत.”
तिने पुढे सांगितलं की, कलाकार आणि इतर सार्वजनिक व्यक्तींचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असतात. त्यामुळे त्यांनी ऑनलाइन कोणतंही कंटेंट शेअर करताना त्याचा परिणाम लक्षात घ्यायला हवा.
इन्फ्लुएन्सरने आपल्या पोस्टमध्ये या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली. “हे खरंच आहे का? आपल्या काही अभिनेत्री पाकिस्तानी झेंडे फडकवून आणि भारतीय देशभक्तीपर गाणी गाऊन पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत, ज्यामुळे एक योग्य प्रश्न निर्माण होतो,” असं तिने लिहिलं.
तिने स्पष्ट केलं की, तिचा आक्षेप बॉलीवूड किंवा भारतीय संगीताला नाही. मात्र, राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रसंगी संवेदनशीलता आवश्यक असल्याचं तिने म्हटलं. “स्वातंत्र्यदिनाची स्वतःची एक वेगळी ओळख, भावना आणि देशभक्तीपर संगीत आहे. गाण्यांची निवड या भावना प्रतिबिंबित करेल अशी अपेक्षा करणं गैर नाही,” असं तिने नमूद केलं.
दरम्यान, इन्फ्लुएन्सरच्या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी तिच्या मताशी सहमती दर्शवत अभिनेत्रींची गाण्याची निवड चुकीची असल्याचं म्हटलं. तर काहींनी कला आणि संगीताला देशाच्या सीमा नसतात, असं म्हणत अभिनेत्रींचा बचाव केला.
एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटलं, “देशभक्तीपर गीत हे देशभक्तीपर गीतच असू शकतं.” तर दुसऱ्याने लिहिलं, “कलेला सीमा नसते, धर्म किंवा देशही नसतो. हे सर्व भावनांबद्दल आहे.”
त्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्रींच्या स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून, गाण्याच्या निवडीवरून सुरू झालेला वाद सध्या दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांमुळे रंगताना दिसत आहे.