(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Ramayana Box Office Collection : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. रणबीर कपूरने प्रभू श्रीराम, साई पल्लवीने सीता आणि यशने रावणाची भूमिका साकारली आहे. प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडेही चर्चेत आले आहेत.
‘रामायण’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल ६४.८५ कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाली. शुक्रवारी चित्रपटाने ४८.०५ कोटी रुपये कमावले. त्यानंतर छोटी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
छोटी दिवाळीच्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या दिवशी ‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर ५४.३५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचे भारतातील एकूण निव्वळ कलेक्शन १६७.२५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तिसऱ्या दिवशी देशभरात चित्रपटाचे अंदाजे २०,१०० शो दाखवण्यात आले. भाषानिहाय कमाईचा विचार केला, तर हिंदीमध्ये ४२.८२ कोटी रुपये, कन्नडमध्ये ५.२९ कोटी रुपये, तेलुगूमध्ये ४.३२ कोटी रुपये आणि तमिळमध्ये १.९२ कोटी रुपयांची कमाई झाली.
‘रामायण’ने केवळ भारतातच नाही, तर परदेशातही चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर २३०.०५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे बजेट अंदाजे ४ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हे बजेट चित्रपटाच्या दोन्ही भागांचे एकत्रित आहे.
या भव्य चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांनी केली आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्यासोबतच रवी दुबे, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंह, लारा दत्ता आणि विवेक ओबेरॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिनेता अनुपम खेर यांनी जटायू या पात्राला आवाज दिला आहे. चित्रपटातील भव्य सेट्स आणि व्हीएफएक्सचेही कौतुक होत आहे. त्यामुळे आगामी दिवसांत ‘रामायण’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






