जमिनीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवा! सयाजी शिंदे यांचे पाली सायडोंगर ग्रामस्थांना आवाहन
टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या जंगलतोड विरोधात गेल्या सहा महिन्यापासून खेद व्यक्त करणारे अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे आज जंगलतोड सुरू असलेल्या पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतमधील सायडोंगर येथे आले आहेत. त्यावेळी पाली कोतवाल खलाटी ग्रामपंचायत ग्रामसवर्धन समितीने सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. त्यावेळी सयाजी शिंदे,कर्जत पर्यावरण बचाव समितीचे ॲड कैलास मोरे,सह्याद्री बचाव समितीचे महेश भारती, तसेच माजी नगराध्यक्ष राजेश लाड आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या गावाकडील आठवण सांगत जमिनी देऊ नका असे आवाहन केले.आपण देखील एक प्रकल्पग्रस्त असून 40 वर्षापूर्वी आमची जमीन धरणासाठी घेतली आणि त्यानंतर 30 वर्षे आपल्याला बदली जमीन मिळ लागले आहेत. जमीन कागदावर दिली पण प्रत्यक्षात अजूनही जमीन मिळाली नाही आणि त्यामुळे लहानशा तुकड्यासाठी आपल्या जीवाचा तुकडा देऊ नका असे आवाहन केले. त्याचवेळी आता तुम्हाला 20 लाख मिळतील पण तुमची जमीन करोडोंची असून जमीन आपली आई आहे आपण आपल्या आईला विकणार का? असा सवाल करीत आम्ही धरणाला जागा देऊन शेकलो आहोत आता तुम्हाला सावध करायला आलो आहे असे आवाहन केले.तुम्ही जमिनी देऊ नका आम्ही बाकी प्रकल्प येथून कसा पिटाळून लावायचा हे पाहतो असे सूचित करीत मी तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले.
शिव मंदिर येथे पर्यावरण प्रेमी रोहिदास लोभी हे स्वच्छतेचे दूत गाडगेबाबा बनून आले होते.त्यांनी जमिनी विकू नका,वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशी अनेक उदाहरणे भारुड सादर करून दिली आणि प्रकल्प येथून हटवण्याचा आपला संकल्प यावेळी भारुडातून बोलून दाखवला. सर्व ग्रामस्थांनी यावेळी या भारुड कार्यक्रम सर्वांनी टाळ्यांची साथ देत सहभाग घेतला.






