( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Sai Godbole:प्रत्येक पालकांसाठी आपल्या मुलांनी मिळवलेलं यश हा अभिमानाचा क्षण असतो. लोकप्रिय मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची मुलगी सई गोडबोले हिनेही आपल्या करिअरमध्ये महत्त्वाचं यश मिळवलं आहे. ‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेमुळे किशोरी गोडबोले घराघरांत लोकप्रिय झाल्या. त्यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता त्यांची लेक सई हिनेही मनोरंजन आणि जाहिरातविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
सईला नुकतीच आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. या नव्या प्रोजेक्टमुळे तिच्या करिअरमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. लेकीच्या या कामगिरीमुळे आई किशोरी गोडबोले यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.
सई गोडबोले ही केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर कंटेंट क्रिएटर म्हणूनही ओळखली जाते. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. याशिवाय तिने Apple सोबतही ब्रँड अँबॅसडर म्हणून काम केलं आहे. आता तिच्या यशात आणखी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँडची भर पडली आहे.
सई नुकतीच L’Oréal Paris या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या जाहिरातीत झळकली आहे. विशेष म्हणजे, केवळ जाहिरातीत दिसण्यापुरतंच तिचं काम मर्यादित राहिलेलं नाही. ब्रँडच्या नव्या प्रोडक्टच्या पॅकेजिंगवरही सईचा फोटो पाहायला मिळत आहे.
या खास कामगिरीबद्दल सईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “मी L’Oréal Paris च्या Casting Crème Gloss च्या पॅकवर झळकलेय. हा लिमिटेड एडिशन शेड आहे. हे खरंच एखाद्या स्वप्नासारखं असून, माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे.”
सईने आपल्या चाहत्यांचे आणि मित्रमैत्रिणींचेही आभार मानले. “मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि माझ्या प्रत्येक कामाला पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार. मी मनापासून कृतज्ञ आहे,” असं तिने म्हटलं.
सईने या प्रोडक्टच्या शेडची मजेशीर पद्धतीने जाहिरातही केली. ‘Spiced Cinnamon Brown’ हा शेड भारतातील मुलींसाठी खास डिझाइन करण्यात आल्याचं तिने सांगितलं.
आपल्या चाहत्यांना गंमतीदार अंदाजात सई म्हणाली की, “आता तुम्हाला हा शेड नक्कीच विकत घ्यायचा आहे, कारण त्याच्या पॅकवर माझा चेहरा आहे.” तिच्या या मजेशीर अंदाजालाही चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
View this post on Instagram
सईच्या या मोठ्या यशाने तिची आई किशोरी गोडबोलेही भारावून गेली आहे. किशोरी यांनी सईच्या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, “ही जाहिरात खरंच खूप सुंदर आहे. सई, तू खूप क्रिएटिव्ह आहेस. लय भारी बेटा… मला तुझा खूप-खूप अभिमान आहे. तुझ्यावर देवाचा आशीर्वाद असाच कायम राहो!”
आईकडून मिळालेल्या या कौतुकामुळे सईसाठी हा क्षण आणखी खास ठरला आहे.
पूजा सावंतनेही केलं कौतुक
सईच्या या खास कामगिरीवर मराठी मनोरंजनविश्वातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री पूजा सावंत हिने सईच्या पोस्टवर कमेंट करत “Queen सई” असं म्हटलं आहे.
पूजाच्या या कमेंटने सईच्या पोस्टची रंगत आणखी वाढली. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनीही सईच्या यशाचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत काम करण्याची संधी आणि प्रोडक्टच्या पॅकेजिंगवर झळकण्याचा मान मिळाल्याने सईच्या करिअरमध्ये ही नक्कीच महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.






