
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Student of the Year: आकाश जायसवाल/ स्टूडेंट ऑफ द ईयर म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते कॉलेज लाइफचं झगमगतं विश्व, मैत्री, रुसवे-फुगवे, स्पर्धा आणि मोठी स्वप्नं पाहणारी तरुणाई! पण Student of the Year: After Dark या वेळी नेहमीच्या कॉलेज ड्रामाला थोडं बाजूला सारत मर्डर मिस्ट्री, मानसिक तणाव आणि गुपितांच्या जाळ्याचा जबरदस्त तडका घेऊन आली आहे. स्ट. टेरेसाच्या परिचित दुनियेत यावेळी ग्लॅमरसोबतच रहस्य आणि संशयाचीही एन्ट्री झाली आहे. नवराष्ट्रने या चित्रपटाला ३.५ स्टार्स दिले आहेत; हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा!
रीमा माया दिग्दर्शित आणि धर्माटिक एंटरटेनमेंट निर्मित ही सहा भागांची सीरिज सध्या जिओ हॉटस्टार वर स्ट्रीम होत आहे. करण जोहर, अदार पूनावाला आणि अपूर्वा मेहता यांच्या पाठबळामुळे या प्रोजेक्टला एक वेगळीच ताकद मिळाली आहे. फ्रँचायझीची जुनी ओळख कायम ठेवत तिला एका नव्या आणि वेगळ्या क्रिएटिव्ह अंदाजात सादर करण्याचा प्रयत्न या सीरिजमध्ये दिसतो.
कथेची सुरुवात होते स्ट. टेरेसामधील सर्वाधिक लोकप्रिय विद्यार्थिनी आयशा मलिकच्या रहस्यमय मृत्यूने. शनाया कपूरने आयशा आणि तिची जुळी बहीण अदिती अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. आपल्या बहिणीच्या मृत्यूमागचं सत्य समोर आल्याशिवाय शांत बसायचं नाही, असा निर्धार अदिती करते.
सत्याचा शोध घेताना अदितीसमोर अनेक गुंतागुंतीचे धागेदोरे उलगडू लागतात. सीक्रेट कॉम्पिटिशन्स, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि लपवून ठेवलेले नातेसंबंध यांचा एक वेगळाच खेळ सुरू असतो. प्रत्येक भागात सगळेच खुलासे करण्याऐवजी कथा हळूहळू संशयाचं वातावरण निर्माण करते आणि प्रेक्षकांना सतत विचार करायला भाग पाडते.
या सीरिजची खासियत म्हणजे कॉलेजचं वातावरणच या मर्डर मिस्ट्रीचा एक महत्त्वाचा भाग बनतं. वरून सगळं काही चकाचक आणि ग्लॅमरस दिसत असलं, तरी त्यामागे महत्त्वाकांक्षा, स्पर्धा आणि काही धक्कादायक गुपितांचं काळं वास्तव दडलेलं आहे. इथे जिंकण्याची इच्छा कधी कोणाला कोणत्या टोकाला घेऊन जाईल, याचा नेम नाही!
शनाया कपूरला या सीरिजमध्ये आपलं अभिनयकौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळाली आहे आणि तिने या संधीचं सोनं केलं आहे. दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना त्यांचा स्वभाव, भावना आणि विचारांमधील फरक जपणं हे सोपं काम नाही. मात्र शनायाने हा टास्क चांगल्या आत्मविश्वासाने पूर्ण केला आहे.
अदितीच्या भूमिकेत शनाया भावनिक तीव्रता घेऊन येते. एका बाजूला बहिणीला गमावल्याचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला आजूबाजूच्या लोकांमधील सत्य शोधण्याची धडपड, या दोन्ही भावनांचा समतोल तिने छान साधला आहे. तिच्या अभिनयात एक फ्रेश कॉन्फिडन्स जाणवतो.
तर आयशाच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांना त्या लोकप्रिय मुलीची ओळख करून देते, जिच्या मृत्यूभोवती संपूर्ण कथानक फिरतं. दोन्ही भूमिकांमधील वेगळेपण अधोरेखित करण्यात शनाया यशस्वी ठरते.
क्रिएटिव्ह ट्रीटमेंट: दिग्दर्शिका रीमा माया यांनी या सीरिजला एक वेगळंच वातावरण दिलं आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेमागचं रहस्य कायम ठेवण्यात त्यांचं दिग्दर्शन प्रभावी ठरतं. उत्तम प्रोडक्शन डिझाइन आणि व्हिज्युअल प्रेझेंटेशनमुळे कॉलेजचं जग प्रेक्षकांना अगदी जवळून अनुभवता येतं.
नाइट सॉन्ग आणि शालोम बेंजामिन यांच्या ओरिजिनल बॅकग्राउंड स्कोअरचंही कौतुक करायला हवं. सीनवर हावी न होता योग्य वेळी सस्पेन्स आणि टेन्शन निर्माण करण्यात संगीत महत्त्वाची भूमिका बजावतं.
दिविक शर्मा, अभिनव सिंह, मान्या ग्रोवर, दीया दामिनी आणि आदि मलिक यांच्यासह सपोर्टिंग कास्टनेही आपापल्या व्यक्तिरेखांमधून कथेत वेगळेपणा आणला आहे.
फायनल टेक: काही सीन्सची एडिटिंग आणखी टाइट करता आली असती, पण एकूणच सीरिजचा अनुभव मनोरंजक ठरतो. स्टूडेंट ऑफ द ईयर: आफ्टर डार्क ही एका लोकप्रिय फ्रँचायझीला नव्या अंदाजात सादर करण्याची चांगली कोशिश आहे. आणि या संपूर्ण खेळात शनाया कपूर ही सीरिजची सर्वात मोठी ताकद म्हणून समोर येते.
मिस्ट्री, तरुणाईचा ड्रामा आणि सस्पेन्स यांचं भन्नाट कॉम्बिनेशन पाहायचं असेल, तर या वीकेंडला ही सीरिज नक्कीच तुमच्या बिंज-वॉचलिस्टमध्ये असायला हवी!