(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Sunil Grover Diwali Viral Photo: अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आपल्या विनोदी अंदाजाने आणि अफलातून अभिनयाने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असतो. त्याच्या अभिनयाची आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याच्या कौशल्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, यावेळी सुनील त्याच्या अभिनयामुळे नव्हे, तर साधेपणामुळे चर्चेत आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्याने असं काही केलं की चाहते त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. दिवाळीच्या दिवशी सुनील रस्त्याच्या कडेला बसून फुलांच्या माळा विकताना दिसला. विशेष म्हणजे, तो काही लहान मुलींसोबत बसून फुलं विकत होता.
सुनील ग्रोव्हरने स्वतः सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो रस्त्याच्या कडेला बसून फुलविक्रेत्या मुलींसोबत फुलांच्या माळा विकताना दिसत आहे. या फोटोसोबत त्याने ‘सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा’ असं कॅप्शन दिलं आहे. त्याचा हा फोटो समोर येताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी त्याच्या साधेपणाचं आणि जमिनीशी जोडलेल्या स्वभावाचं कौतुक केलं आहे.
एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं, ‘भाऊ, तू किती वेळा मन जिंकणार आहेस?’ तर दुसऱ्याने ‘काय व्यक्ती आहेस तू!’ अशी प्रतिक्रिया दिली. आणखी एका चाहत्याने ‘व्वा, तू किती साधा आणि जमिनीवर पाय असलेला आहेस’, असं म्हणत त्याचं कौतुक केलं. तर काही चाहत्यांनी त्याची तुलना इतर कलाकारांशी करत त्याचं वेगळेपण अधोरेखित केलं. सुनीलच्या या फोटोवरून त्याचा साधेपणा पुन्हा एकदा चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सुनील ग्रोव्हर केवळ त्याच्या साधेपणामुळेच नाही, तर अभिनयामुळेही चर्चेत आहे. चित्रपट आणि ओटीटीवरील विविध भूमिकांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विशेषतः ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधील त्याच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खळखळून हसवतात. सलमान खान, आमिर खान, नवज्योत सिंग सिद्धू, कपिल देव, गुलजार आणि कादर खान यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींची हुबेहूब नक्कल करून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
आता सुनील पुन्हा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या निर्मात्यांनी आगामी भागाचा प्रोमो शेअर केला असून, यामध्ये सुनील माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिरेखेत दिसत आहे. त्याने या भूमिकेला ‘सरल बिहारी वाजपेयी’ असं नाव दिलं आहे. त्याचा लूक, बोलण्याची पद्धत आणि हावभाव पाहून मंचावरील कलाकारांसह उपस्थित पाहुणेही आश्चर्यचकित झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं.
या प्रोमोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि अर्चना पूरण सिंग यांच्यासह उपस्थित पाहुण्यांच्याही प्रतिक्रिया पाहायला मिळतात. सुनीलने अटलबिहारी वाजपेयी यांची व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने साकारली आहे, त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. त्याचा हा प्रोमो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
दरम्यान, शनिवारी ७ नोव्हेंबर रोजी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पाचव्या पर्वात झाकीर खान, पंकज त्रिपाठी आणि विकास दिव्यकीर्ती पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या भागात त्यांच्या आयुष्यातील आठवणी, यशोगाथा आणि अनेक मजेदार किस्से पाहायला मिळाले. एकीकडे दिवाळीत फुलांच्या माळा विकतानाचा साधा अंदाज, तर दुसरीकडे अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेतील दमदार अभिनय, अशा दोन्ही गोष्टींमुळे सुनील ग्रोव्हर सध्या चर्चेत आहे.






