
Kolhapur News, Gokul Milk Union, Satej Patil
Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. गोकुळमध्ये चार शासननियुक्त तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या अध्यादेशाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. या अध्यादेशानुसार या संचालकांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे. त्यामुळे २५ सदस्यीय संचालक मंडळात १३ जागा जिंकणाऱ्या सतेज पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पण त्याचवेळी या निर्णयामुळे महायुतीला गोकुळच्या सत्तास्थापनेत सहभागी होण्याचा मार्ग खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारच्या अध्यादेशाला राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर सतेज पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. सतेज पाटील यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाऊंटवरून कोल्हापुरकरांना गोकुळमध्ये सुरु असलेल्या मनमानी काराभाराविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. “तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ? असा सवाल बंटी पाटील यांनी उपस्थि केला आहे.
इतकेच नव्हे तर, “चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान ! घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही! लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तसेच, कोल्हापुरकरांना साद घालत सतेज पाटील यांनी ९ नोव्हेंबरला दसरा चौकात आंदोलनाची हाक दिली आहे., “आता यायला लागतंय! कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा.. 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..” असं लिहीत त्यांनी कोल्हापुरकरांना गोकुळमध्ये सुरु असलेल्या गैरकारभाविरोधात जमण्याचे आवाहन केलं आहे.
गोकुळच्या अटीतटीच्या निवडणुकीत महायुतीला पराभव झाला. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १३, तर महायुतीने १२ जागा जिंकल्या होत्या. या निकालानंतर महायुती सरकारने गोकुळमध्ये पाच शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. या पाच संचालकांपैकी एक जण सहाय्यक निबंधक दर्जाचा शासकीय अधिकारी असेल, तर उर्वरित चार जणांना सहकारी संस्थांच्या कामकाजाचा अनुभव असणे अपेक्षित आहे. या चार तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्याला मतदान करता येणार नाही.
चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने गोकुळमधील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. निवडणुकीत १२ जागा मिळवलेल्या महायुतीला या नियुक्त्यांमुळे संचालक मंडळात अतिरिक्त पाठबळ मिळू शकते. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, कोल्हापूर दूध उत्पादक संघातील पाच शासननियुक्त सदस्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपालांनी अध्यादेशाला मंजुरी दिल्यानंतर या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यांमध्ये गोकुळमध्ये शौमिका महाडिक, नाविद मुश्रीफ, अशोक फरकटे तर आणखी एकासह सहाय्यक निंबधक दर्जाचा अधिकारी अशा पाच जणांचा समावेश करण्यात आहे. नाविद मुश्रीफ हे या निवडणुकीत पराभूत झाले असतानाही त्यांचीही या सदस्यांमध्ये बॅकडोअर एंट्री झाली आहे.
Ans: राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्य सरकारच्या अध्यादेशाला मंजुरी दिली असून, त्यानुसार गोकुळवर नियुक्त होणाऱ्या ४ तज्ज्ञ संचालकांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला आहे.
Ans: सतेज पाटलांनी संताप व्यक्त करत, "हा सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. गोकुळ ही कोणाची जहागीर नाही," अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला.
Ans: सतेज पाटील यांनी येत्या ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा' काढण्याची घोषणा केली आहे.