(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
National Crush: सोशल मीडियावर दर काही दिवसांनी एखादा नवा चेहरा अचानक चर्चेत येतो. सध्या तान्या मिश्रा हे नाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तान्याचे ग्लॅमरस फोटो आणि स्टायलिश अंदाज पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला भारताची नवी ‘नॅशनल क्रश’ म्हणायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, तिच्या डोळ्यांचंही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
यापूर्वी रश्मिका मंदाना, मराठी अभिनेत्री गिरीजा ओक, प्रिया प्रकाश वारियर आणि तृप्ती डिमरी यांनाही सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून संबोधलं गेलं आहे. आता तान्या मिश्रा या नावाची त्यात भर पडली आहे. त्यामुळे साहजिकच अनेकांना प्रश्न पडला आहे की, तान्या मिश्रा नेमकी कोण आहे? ती काय करते आणि तिला अचानक ‘नॅशनल क्रश’ का म्हटलं जात आहे?
तान्या मिश्रा सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तिच्या सौंदर्याचं आणि विशेषतः डोळ्यांचं नेटकरी कौतुक करत आहेत.
काही जण तिच्या डोळ्यांवर फिदा झाले आहेत, तर काही जण तिच्या मोहक अंदाजाचं कौतुक करत आहेत. याच कारणामुळे सोशल मीडिया यूजर्सकडून तिला ‘नॅशनल क्रश’ हा टॅग मिळाला आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही मोठा चाहतावर्ग असून, तिला सुमारे १२ लाख लोक फॉलो करतात.
चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम
तान्या मिश्रा केवळ मॉडेलिंगपुरती मर्यादित नाही. तिने अभिनय क्षेत्रातही काम केलं आहे. ‘गजनवी’ आणि ‘चेज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. याशिवाय ‘चिड़िया उड़’ या वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे.
आता तान्या लवकरच ‘सफर मोहब्बत का’ या नवीन म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तिच्या आगामी प्रोजेक्टकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
बिहारच्या गया येथील आहे तान्या
तान्या मिश्रा मूळची बिहारमधील गया येथील आहे. तिचा जन्म ३१ जानेवारी १९९९ रोजी झाला. सध्या ती मुंबईत राहते. मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने मगध विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली.
यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात करिअरला सुरुवात केली. तान्याने फेमिना, फिल्मफेअर आणि ग्राझिया यांसारख्या प्रसिद्ध फॅशन आणि चित्रपट मासिकांसाठी फोटोशूट केले आहेत.
एप्रिल-मे २०१४ मध्ये फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकल्यानंतर तान्याला पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने मॉडेलिंगसोबतच अभिनय क्षेत्रातही आपला प्रवास सुरू ठेवला.
२०१९ मध्ये तिने IAWA मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ती चौथी उपविजेती ठरली होती. त्यानंतरही तिने मॉडेलिंग आणि मनोरंजन क्षेत्रात काम सुरू ठेवलं.
दरम्यान, तान्याला सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हटलं जात असलं, तरी हा अधिकृत किताब नसून चाहत्यांकडून सोशल मीडियावर दिला जाणारा अनौपचारिक टॅग आहे. सध्या तिच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे तान्याचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.






