
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
The Paradise Teaser: नेचरल स्टार नानीचा बहुप्रतीक्षित पॅन-इंडियन चित्रपट ‘द पॅराडाइज’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी चित्रपटातील ‘आया शेर’ हे गाणे सोशल मीडियावर मोठे चार्टबस्टर ठरले होते. आता निर्मात्यांनी चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित केला असून त्यामध्ये नानीचा रौद्र अवतार आणि जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
‘द पॅराडाइज’ हा 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटात नेचरल स्टार नानी मुख्य भूमिकेत असून दिग्दर्शनाची धुरा श्रीकांत ओडेला यांनी सांभाळली आहे. ‘दसरा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता आहे.
घोषणेपासूनच दमदार पोस्टर्स, प्रभावी प्रमोशनल कंटेंट आणि सुपरहिट ‘आया शेर’ गाण्यामुळे चित्रपट सतत चर्चेत राहिला आहे. या गाण्याला यूट्यूबवर 20 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ते सोशल मीडियावरही प्रचंड ट्रेंड झाले आहे.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जबरदस्त अॅक्शन, ड्रामा आणि भव्य दृश्यांची मेजवानी पाहायला मिळते. श्रीकांत ओडेला यांनी झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर उभी केलेली रॉ आणि वास्तववादी दुनिया प्रभावीपणे साकारली आहे.
टीझरमध्ये नानी अतिशय धडकी भरवणाऱ्या अंदाजात दिसत असून राघव जुयाल धोकादायक खलनायकाच्या भूमिकेत झळकत आहेत. दोघांमधील संघर्ष, दमदार बॅकग्राउंड स्कोअर आणि नेत्रदीपक व्हिज्युअल्समुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
चित्रपटातील ‘आया शेर’ या गाण्याने आधीच अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यूट्यूबवर या गाण्याला 20 कोटींहून अधिक व्ह्यूज आणि 18 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. इन्स्टाग्रामवर हजारो रील्स तयार करण्यात आल्या असून चाहते नानीचा लूक आणि त्यांचा सिग्नेचर हुकस्टेप मोठ्या उत्साहाने रिक्रिएट करत आहेत.
एसएलव्ही सिनेमाजच्या बॅनरखाली निर्मित ‘द पॅराडाइज’ हा चित्रपट 24 सप्टेंबर 2026 रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, इंग्रजी आणि स्पॅनिश अशा आठ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, जागतिक प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी हॉलिवूड स्टार रायन रेनॉल्ड्स यांच्याशी संपर्क साधल्याच्या चर्चा रंगल्या असल्या, तरी याबाबत निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दूरदृष्टी असलेले दिग्दर्शन, दमदार स्टारकास्ट आणि भव्य मांडणीमुळे ‘द पॅराडाइज’ हा 2026 मधील सर्वात मोठ्या पॅन-इंडियन चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.