
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
नीट परीक्षा पेपरफुटीविरोधात देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलने अजूनही सुरू असतानाच OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ने आपल्या आगामी वेब सीरिज ‘द स्कॅम-लीक्ड’ (The Scam-Leaked)चा दमदार टीझर प्रदर्शित केला आहे. अवघ्या १ मिनिट ९ सेकंदांच्या या टीझरने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली असून, त्यातील कथानक अलीकडील पेपरफुटीच्या वादाची आठवण करून देत असल्याची चर्चा सुरू आहे.
टीझरची सुरुवात अतिसुरक्षित प्रिंटिंग प्रेसमधून होते. येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या गोपनीय प्रश्नपत्रिका छापल्या जातात. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्या सील करून व्हॅनमध्ये पाठवल्या जातात. मात्र, याच ठिकाणी कथेला नाट्यमय वळण मिळते. प्रश्नपत्रिकांची वाहतूक सुरू असताना एक व्यक्ती गुपचूप प्रश्नपत्रिकेची प्रत दुसऱ्याला देतो. त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ऑनलाइन चॅटद्वारे ती लीक केली जाते.
यानंतर टीव्ही स्क्रीनवर “वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली, CBI तपास सुरू” अशी ब्रेकिंग न्यूज झळकते आणि कथानक अधिकच उत्कंठावर्धक बनते.
टीझरमधील सर्वाधिक धक्कादायक दृश्य शेवटी पाहायला मिळते. एका रिकाम्या वर्गात मोबाईल फोन वाजत असतो आणि स्क्रीनवर “Papa Calling” असा संदेश दिसतो. कॅमेरा वर सरकल्यानंतर आरशात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे दृश्य दाखवले जाते. हा प्रसंग केवळ अंगावर शहारे आणणारा नसून, पेपरफुटीच्या गंभीर परिणामांकडेही लक्ष वेधतो.
जरी टीझर पाहिल्यानंतर अनेकांना नीट पेपरफुटी प्रकरणाची आठवण होत असली, तरी निर्मात्यांनी ही कथा कोणत्याही विशिष्ट वास्तविक घटनेवर आधारित असल्याचा दावा केलेला नाही. तसेच, मालिकेतील कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, टीझरवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. एका नेटकऱ्याने, “कृपया याची जाहिरात करू नका… थेट प्रदर्शित करा,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, “तुम्ही ट्रेलरही लगेच प्रदर्शित करायला हवा होता,” असे म्हटले. अनेकांनी या मालिकेबद्दल उत्सुकता व्यक्त करत ती लवकर प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे.