(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Vidyut Jammwal: बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या जबरदस्त फिटनेस, मार्शल आर्ट्स कौशल्य आणि अनोख्या योगाभ्यासासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरही तो कायम सक्रिय असतो. आपल्या आव्हानात्मक व्यायामाचे आणि योगासनांचे व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सध्या विद्युतचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.
मुंबईत ‘स्ट्रीट फायटर’च्या एका विशेष कार्यक्रमात विद्युत जामवालने हजेरी लावली होती. यावेळी त्याने असं काही करून दाखवलं की, उपस्थितांनाही काही क्षण आश्चर्याचा धक्का बसला. विद्युतने कार्यक्रमात सुमारे १५ मिनिटं श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमादरम्यान विद्युत पूर्णपणे स्थिर बसला होता. त्याने आपल्या योगसाधनेचं प्रात्यक्षिक सादर केलं. मात्र, जसजसा वेळ पुढे गेला, तसतसं त्याचं शरीर थरथरू लागलं आणि त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
विद्युतला अशा अवस्थेत पाहून उपस्थित प्रेक्षकही चिंतेत पडले. मात्र, त्याने आपली साधना पूर्ण केली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, विद्युतच्या या कौशल्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
‘स्ट्रीट फायटर’मध्ये विद्युत जामवालने धल्सिम या गेमिंग पात्राची भूमिका साकारली आहे. हे पात्र योग आणि आध्यात्मिक साधनेशी जोडलेलं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटातील पात्राचे गुण आणि स्वतःची योगसाधना यांच्यातील संबंध दाखवण्यासाठी विद्युतने हे विशेष प्रात्यक्षिक सादर केल्याचं सांगितलं जात आहे.
पतंजलीच्या योगसूत्रातील तंत्राचा केला उल्लेख
मेडिटेशन पूर्ण केल्यानंतर विद्युतने आपल्या या साधनेबद्दल सांगितलं. त्याने पतंजलीच्या योगसूत्रांमधील एका विशेष तंत्राचा वापर केल्याचं सांगितलं. या सरावामुळे आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे गाठण्यास मदत झाल्याचंही त्याने म्हटलं.
विद्युतच्या मते, योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा मार्ग नाही, तर तो मानसिकदृष्ट्याही व्यक्तीला मजबूत बनवतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आत्मनियंत्रण आणि शांत राहण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची असल्याचं त्याने सांगितलं.
View this post on Instagram
यावेळी विद्युतने तरुणांसाठी खास संदेशही दिला. आजच्या काळात प्रत्येकजण काही ना काही मिळवण्याच्या शर्यतीत धावत आहे. प्रत्येकाचं लक्ष सतत निकालांकडे असतं. मात्र, या धावपळीत काही क्षण थांबून शांत राहणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं विद्युतने सांगितलं.
तरुणांनी काही काळासाठी स्वतःला थांबवून स्थिर राहण्याचा सराव करावा, असा सल्लाही त्याने दिला. विद्युतच्या या अनोख्या योगप्रात्यक्षिकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.






