(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Yash Instagram Following: कन्नड सुपरस्टार यश सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. यश लवकरच दोन मोठ्या पॅन-इंडिया चित्रपटांमध्ये दिसणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये तो रावणाची भूमिका साकारत आहे, तर ‘टॉक्सिक’ या चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, या चित्रपटांव्यतिरिक्त यश त्याच्या सोशल मीडिया फॉलोइंगमुळेही चर्चेत आला आहे.
यशला इन्स्टाग्रामवर १.४३ कोटींहून अधिक लोक फॉलो करतात. मात्र, एवढ्या मोठ्या फॉलोअर्स बेस असलेल्या या सुपरस्टारच्या फॉलोइंग लिस्टमध्ये फक्त एकाच व्यक्तीचं नाव आहे. विशेष म्हणजे, यश रणबीर कपूर, साई पल्लवी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रजनीकांत किंवा इतर कोणत्याही सेलिब्रिटीला फॉलो करत नाही.
यश इन्स्टाग्रामवर फक्त त्याची पत्नी आणि अभिनेत्री राधिका पंडित हिला फॉलो करतो. नुकताच यश ‘आपकी अदालत’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याला सोशल मीडियावर केवळ एका व्यक्तीला फॉलो करण्यामागचं कारण विचारण्यात आलं.
यावर यशने मजेशीर अंदाजात उत्तर दिलं, “मी फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो आणि ती म्हणजे माझी पत्नी राधिका. ती माझी एकमेव मैत्रीण आहे, त्यामुळे मला तिला फॉलो करावंच लागतं.”
यशने यावेळी पत्नी राधिका पंडितबद्दलही मनापासून भाष्य केलं. आपल्या आयुष्यात राधिका असल्यामुळे आपण स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असं त्याने सांगितलं.
यशच्या मते, त्याच्या आयुष्यातील कठीण काळातही राधिकाने त्याची साथ सोडली नाही. दोघांनी एकत्र संघर्ष केला आणि आयुष्यात पुढे वाटचाल केली. आज यश ज्या स्थानावर आहे, त्यामध्ये राधिकाचा मोठा वाटा असल्याचंही त्याने मान्य केलं.
यशने पत्नीला आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असल्याचं सांगितलं. त्यामुळेच सोशल मीडियावर त्याच्या फॉलोइंग लिस्टमध्ये फक्त राधिकाचं नाव असणं चाहत्यांसाठीही खास चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, यशच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’मध्ये यश रावणाची भूमिका साकारत आहे. याशिवाय तो ‘टॉक्सिक’मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या दोन्ही चित्रपटांमुळे यशच्या पॅन-इंडिया स्टारडममध्ये आणखी मोठी भर पडण्याची शक्यता आहे.
