(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Zimmad: मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. मात्र, यावेळी हेच कलाकार कॅमेऱ्यापासून दूर जात पावसाळी वातावरणात एकत्र येत मनसोक्त धमाल करताना पाहायला मिळाले. अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘झिम्माड’ या विशेष पावसाळी मेळाव्यात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले.
पुण्याजवळील मॅरीगोल्ड बॅन्क्वेट्सच्या ‘डी लश’ येथे रंगलेल्या या सोहळ्यात सुबोध भावे, स्वाती चिटणीस, मंदार चोळकर, शशांक केतकर, जयवंत वाडकर, विजय पाटकर, सुशांत शेलार, शंतनू मोघे, प्रिया बेर्डे, तुषार दळवी, रेशम टिपणीस, भरत दाभोळकर, मकरंद अनासपुरे, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, सागर कारंडे, पुष्कर जोग, अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत पानसे, सचित पाटील यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले.
सकाळपासूनच कलाकारांच्या आगमनाने ‘डी लश’चा परिसर गजबजून गेला होता. नेहमी शूटिंगच्या धावपळीत भेटणाऱ्या कलाकारांना यावेळी कामाची घाई नव्हती. त्यामुळे कलाकारांनी मनसोक्त गप्पा, खेळ, नाच-गाणी आणि हास्यविनोद करत दिवसाचा आनंद लुटला.
पावसाळ्याला साजेसे खाद्यपदार्थ आणि मित्रांचा सहवास यामुळे हा निवांत मेळावा आणखी खास ठरला.
‘झिम्माड’ची सुरुवात राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिच्या गणेशस्तवनाने झाली. त्यानंतर गायक-संगीतकार मिलिंद इंगळे यांनी ‘गारवा’मधील लोकप्रिय कविता आणि गाणी सादर केली.
‘गारवा’च्या शब्द-सुरांनी उपस्थित कलाकारांना जुन्या आठवणींच्या रम्य प्रवासावर नेलं. त्यानंतर आर्या आंबेकर, विश्वजीत जोशी, सावनी रवींद्र आणि अजित परब यांनी लोकप्रिय गाणी सादर करत मैफिल रंगवली.
खास आग्रहास्तव पंढरीनाथ कांबळे आणि आस्ताद काळे यांनीही गाणी सादर केली. इतकंच नाही, तर पुष्कर श्रोत्री यांनाही गाणं सादर करण्याचा आग्रह करण्यात आला. समीर सामंत आणि मंदार चोळकर यांच्या कवितांनीही कार्यक्रमात रंग भरला.
या आनंदाच्या वातावरणात मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, लीला गांधी, फैय्याज, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, मोहन जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक राणे यांचा विशेष कृतज्ञता सन्मान करण्यात आला.
तसंच, दिग्दर्शक प्रविण तरडे यांना ‘देऊळबंद-२’साठी ‘झिम्माड धुंव्वाधार सन्मान’ प्रदान करण्यात आला. आपल्या आधीच्या पिढीच्या योगदानाला दिलेला हा सन्मान सोहळ्यातील भावनिक क्षण ठरला.
‘झिम्माड’चा मुख्य उद्देश कलाकारांनी केवळ सहकलाकार म्हणून नव्हे, तर मित्र म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवावा, हा आहे. शूटिंगच्या धावपळीत राहून गेलेल्या गप्पा, जुन्या आठवणी, नव्या ओळखी आणि संगीत-कवितेच्या मैफलीमुळे यंदाचा दिवस कलाकारांसाठी खास ठरला.
याबद्दल बोलताना पुष्कर श्रोत्री म्हणाले की, वर्षभर प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे कलाकार म्हणून भेटण्यापेक्षा मित्र म्हणून भेटणं आणि वेळ घालवणं हीच ‘झिम्माड’ची संकल्पना आहे. यावेळी सगळ्यांनी काम, शूटिंग आणि वेळापत्रक बाजूला ठेवून दिवस मनापासून एन्जॉय केला. विशेषतः ज्येष्ठ कलाकारांसोबत वेळ घालवता आला आणि त्यांचा सन्मान करता आला, याचा आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘सुरेल क्रिएशन्स’कडून आयोजन
या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन मानसी इंगळे यांच्या ‘सुरेल क्रिएशन्स’तर्फे करण्यात आलं. त्यांना ज्येष्ठ जाहिरातदार पराग शहाणे यांची साथ लाभली.
पावसाळ्याच्या निमित्ताने सुरू झालेला ‘झिम्माड’ हा उपक्रम आता मराठी कलाकारांच्या मैत्रीचा आणि एकत्र येण्याचा खास सोहळा ठरत आहे. पावसाच्या सरी, कविता-संगीताची मैफल आणि मित्रांचा सहवास यामुळे यंदाचा ‘झिम्माड’ कलाकारांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरला.





