Heart Attack येण्याच्या महिनाभर आधी शरीर देत असतो हे 6 संकेत; दुर्लक्षित करणे जीवावर बेतेल
आजच्या काळात जवजवळ प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होते सामान्य बनले आहे. मधुमेह, लठ्ठपणा या आजारांसहच हृदयरोगांचा धोका देखील आता कित्येक पटींनी वाढला आहे. ही एक सामान्य पण धोकादायक समस्या बनली आहे, जी अचानक कधीही घडू शकते. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर आपला जीव जाण्याचाही धोका वाढतो.
7 दिवसात 5 किलो वजन कमी करतील 5 व्यायाम, व्हाल आश्चर्यचकीत; तज्ज्ञांनी सांगितले सत्य
हृदयविकाराचा धोका हा हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याने निर्माण होतो. हा झटका अचानक येतो ज्यामुळे व्यक्तीचा जीव जाण्याचा धोका वाढतो मात्र फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की, हृदयविकाराचा झटका येण्याआधी आपले शरीर आपल्याला काही संकेत देखील देत असतो, जे जाणून घेताच आपण हा धोका टाळू शकतो आणि वेळीच यावर उपचार केले जाऊ शकतात. हे संकेत नक्की कोणते आहेत ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
छातीत दुखणे
मेयो क्लिनिकच्या मते, जर तुम्हाला तुमच्या छातीत मध्यभागी वेदना, जळजळ, दाब किंवा जडपणा अशा समस्या जाणवत असतील तर हा मोठा धोका ठरू शकतो, याला हल्ल्यात घेण्याची चूक अजिबात करू नका. हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य आणि पहिले लक्षण आहे. कधीकधी ही वेदना छातीपासून हात, मान, पाठ, जबडा किंवा अगदी पोटापर्यंत पसरू शकते. अशी समस्या जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांना गाठा आणि यावर योग्य ते उपचार सुरु करा.
अशक्तपणा जाणवणे
जर तुम्हाला कोणतेही जड काम न करता अशक्तपणा जाणवत असेल तर हे हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते. जेव्हा आपले हृदय शरीराच्या इतर भागांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवू शकत नाही, तेव्हा शरीर लवकर थकते. तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
श्वास लागणे
जर तुम्हाला कोणतेही जड काम न करताही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. छातीत दुखण्यासोबत अनेकदा श्वास घेण्यास त्रास होतो, परंतु कधीकधी हे लक्षण एकटे देखील दिसून येते. याकडे दुर्लक्ष करू नका आणि हॉस्पिटल गाठा.
घाम येणे
जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नाही तेव्हा रुग्णाला जास्त घाम येऊ लागतो. अनेकजण याला सामान्य लक्षण समजून याकडे दुर्लक्ष करतात मात्र हे
हृदयविकाराचे लक्षण असू शकते ज्यात जिवाचा धोका वाढतो. त्यामुळे वारंवार असे होत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
झोप न लागणे
जर रात्री तुमची झोप वारंवार खंडित होत असेल किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. बरेच लोक तणाव समजून त्याकडे दुर्लक्ष करतात मात्र तुमची ही चूक तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते.
चक्कर येणे
जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय चक्कर येत असेल किंवा उभे राहताच डोळ्यांसमोर अंधारी येत असेल तर हे हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते. ही लक्षणे सामान्य वाटतं असली तरी याचे परिणाम भयानक ठरू शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.