तुमचे पाय तुमच्या आरोग्याची स्थिती सांगत असतात, शरीरात 'ही' लक्षणे दिसताच सावध व्हा नाहीतर महागात पडेल
आपले शरीर आपल्या आरोग्याविषयी अनेक संकेत देत असते आणि पाय हे देखील त्याला अपवाद नाहीत. पाय आपल्या आरोग्याचे प्रतिबिंब असतात, जे अनेक आजार आणि शारीरिक समस्यांविषयी आधीच संकेत देऊ शकतात. जर तुमच्या पायांमध्ये काही असामान्य बदल दिसत असतील, तर ते तुमच्या अंतर्गत आरोग्याशी संबंधित काही महत्त्वाची माहिती देत असतात. काही वेळा सामान्य वाटणारी ही लक्षणे अनेक गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. या लक्षणांना वेळीच ओळखून तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
पाय थंड पडणे
तुमचे पाय नेहमी थंड असल्यास, हे खराब रक्त परिसंचरण, अशक्तपणा किंवा थायरॉईड अशा समस्यांचे लक्षण असू शकते. हे लक्षण मधुमेही रुग्णांनाही जाणवू शकते. पायात रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे पायांना अशी थंडी जाणवू लागते. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पायांना मुंग्या येणे
जर वारंवार तुमच्या पायांना मुंग्या येत असतील किंवा तुमचे पाय सुन्न पडत असतील तर ते मज्जातंतूंच्या नुकसानाचे लक्षण असू शकते. ही समस्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सामान्य आहे, ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. ही समस्या व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता किंवा अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे जाणवू शकते. याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.
Weight Loss Tips: भिजवलेले की शिजवलेले… वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारे करावे Oats चे सेवन?
पायांच्या नखांमध्ये होणारे बदल
पायांच्या नखांमध्ये होणारे बदल देखील आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देऊ शकतात. जर नखे पिवळे पडत असतील, तर तो बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन) किंवा सोरायसिसचा संकेत असू शकतो. नखांवर पांढरे ठिपके दिसत असल्यास शरीरात झिंक किंवा कॅल्शियमची कमतरता असू शकते. तसेच, नखे अधिक जाडसर किंवा विकृत दिसत असतील, तर ते फुफ्फुसांच्या आजारांचे लक्षण असू शकते.
पाय दुखणे किंवा आखडणे
पायांमध्ये कायमस्वरूपी वेदना होत असतील किंवा पाय आखडत असतील तर हे संधिवात किंवा स्नायूंमध्ये ताण आल्याचे लक्षण असू शकते. जर सकाळी उठल्यानंतर पाय जड किंवा आखडल्यासारखे वाटत असतील, तर ते संधिवाताचे लक्षण असू शकते. तसेच, हाडांची कमजोरी देखील पायांमध्ये वेदना निर्माण करू शकते. त्यामुळे जर पायांमध्ये ही लक्षणे सतत जाणवत असतील, तर वेळेवर वैद्यकीय तपासणी करून योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.