“रशियाकडून फंडिंग घेत काँग्रेसने देशाला गुलाम बनवलं”; निशिकांत दुबे यांचे काँग्रेसवर खळबळजनक आरोप
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका स्फोटक पोस्टमध्ये त्यांनी, काँग्रेसचे अनेक खासदार आणि काही पत्रकार सोव्हिएत रशियाकडून थेट फंडिंग घेत होते, असा दावा त्यांनी केला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्था ‘सीआयए’च्या (CIA) काही ‘अनक्लासिफाइड’ दस्तावेजांचा आधार घेत त्यांनी हा दावा केला आहे. या पोस्टनंतर काँग्रेसच्या भूतकाळावर आणि विदेशी हस्तक्षेपावर चर्चा रंगली आहे.
निशिकांत दुबे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केलं की, “सीआयएचा एक गोपनीय दस्तावेज २०११ मध्ये सार्वजनिक झाला होता. त्यानुसार, तत्कालीन काँग्रेस नेते एच. के. एल. भगत यांच्या नेतृत्वाखाली १५० हून अधिक काँग्रेस खासदार रशियाकडून आर्थिक सहाय्य घेत होते. हे खासदार सोव्हिएत रशियासाठी दलाली करत होते. त्या काळात भारत म्हणजे दलालांचा अड्डा बनला होता.”
दुबे यांनी याच पोस्टमध्ये असेही म्हटले की, केवळ राजकारणीच नाही, तर काही पत्रकारही रशियाकडून पैसे घेऊन त्यांच्या बाजूने लेख लिहित होते. “१६,००० हून अधिक लेख रशियाच्या सांगण्यावरून भारतात प्रकाशित झाले होते,” असा दावा त्यांनी केला.
“भारतात ११०० रशियन गुप्तहेर कार्यरत होते”
या पोस्टमध्ये निशिकांत दुबे यांनी आणखी एक महत्त्वाचा आरोप करत सांगितले की, “त्या काळात भारतात रशियाच्या गुप्तचर संस्थांचे ११०० प्रतिनिधी काम करत होते. त्यांनी भारतीय नोकरशाही, व्यापारी संघटना, कम्युनिस्ट पक्ष आणि जनमत घडवणाऱ्या व्यक्तींना आपल्या प्रभावाखाली ठेवले होते. हे लोक भारताच्या धोरणांवर प्रभाव टाकत होते.”
‘जर्मन सरकारकडून निवडणुकीसाठी पैसा’
दुबे यांनी काँग्रेसच्या माजी उमेदवार सुभद्रा जोशी यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, “सुभद्रा जोशी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जर्मन सरकारकडून पाच लाख रुपये घेतले होते. त्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या आणि नंतर इंडो-जर्मन फोरमच्या अध्यक्ष बनल्या.” या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत दुबे यांनी विचारले, “हा देश आहे की काँग्रेसच्या दलालांचा खेळ?”
निशिकांत दुबे हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसद पासवर्डचा गैरवापर आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला होता. त्याच प्रकरणात महुआ मोईत्रांची संसद सदस्यता रद्द झाली होती. मात्र २०२४ च्या निवडणुकीत त्या पुन्हा निवडून आल्या.
दुबे यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून काहींनी गंभीर चौकशीची मागणी केली आहे. “इतके गंभीर आरोप असूनही यावर अद्याप कोणतीही अधिकृत चौकशी का झाली नाही?” असा सवाल खुद्द दुबे यांनीच केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसकडून अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर आलेले नाही. मात्र, दुबे यांच्या या आरोपांमुळे काँग्रेसच्या भूतकाळातील भूमिका आणि विदेशी हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेसकडून प्रत्युत्तर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निशिकांत दुबे यांनी लावलेले आरोप केवळ राजकीय आरोप नसून, ते भारताच्या परराष्ट्र धोरण, पत्रकारिता आणि लोकशाही प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करतात. जर हे आरोप तथ्याधारित असतील, तर यावर खोलवर आणि स्वतंत्र चौकशी आवश्यक असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, काँग्रेस या आरोपांना कसे उत्तर देते याकडे देशाचे लक्ष लागले आहे.