भाजपच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम; अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला
तेलंगणामध्ये भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षाचं नाव अद्याप जाहीर झालेले नसताना पक्षात बंडखोरी सुरू झाली आहे. गोशामहलचे आमदार आणि राज्यातील भाजपचा मोठा चेहरा असलेले टी. राजा सिंह यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची परवानगी न दिल्यामुळे ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. हायकमांडकडून रामचंद्र राव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
राज्यातील जातीय समीकरणं राखण्यात मोठं योगदान असल्यामुळे रामचंद्र राव यांना अध्यक्ष बनवण्यामागील एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे. राव तेलंगणामधील ब्राह्मण समुदायातून येतात आणि त्यांना संघटना मजबूत करण्यासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीत विचारमंथन सुरू असताना आणि भाजप तेलंगणामध्ये संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
टी राजा सिंह तेलंगणामधील लोकप्रिय नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी हिंदुत्वासोबतच राष्ट्रवादी विचारसरणीचा उघडपणे प्रचार करत राज्याच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण केले. राज्यात काँग्रेसच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही ते निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले. पक्ष आणि संघटना मजबूत करण्यासाठी आणि तरुणांना भाजपशी जोडण्यासाठी ते सतत रॅली, बैठका आणि कार्यक्रम घेत होते. तरीही त्यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून लांब ठेवण्यात आलं.
दरम्यान तेलंगणा भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी, आपण मोठ्या निराशेने पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व सोडत असल्याचं म्हटलं आहे.
टी राजा सिंह यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलंय की, ‘मीडिया रिपोर्ट्सनुसार रामचंद्र राव तेलंगणा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असू शकतात. हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक आहे. माझ्यासोबत खंबीरपणे उभे असलेल्या लाखो कार्यकर्त्यांसाठीही हा एक अतिशय दुःखद निर्णय आहे. कार्यकर्त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. टायगर म्हणून प्रसिद्ध असलेले टी राजा सिंह यांनी २०१८ मध्ये गोरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता, हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आणि गोशामहलच्या लोकांची सेवा करण्यासाठी काम करत राहीन असं त्यांनी त्यावेळी पत्रात म्हटलं होतं. मात्र पक्षाने त्यावेळी त्याचा राजीनामा स्वीकारला नव्हता. आता भाजप त्यांची मनधरणी करणार की टी राजा कोणता मोठा निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.