बोगद्यात अडकलेल्या कामगारांना नैराश्यातून वाचवण्यासाठी पाठवली औषधं, खाण्यासाठी सुके मेवे

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगद्यात गेल्या 7 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

  उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगदा दुर्घटनेला (Uttarkashi Tunnel Accident) आज ७ दिवस झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे. आत अडकलेल्या कामगारांना अन्नपुरवठा करण्यात येत आहे, त्यांना ऑक्सिजन पुरवण्यात येत आहे. या बचावकार्यादरम्यान, आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. आत अडकलेल्या ४१ मजुरांना नैराश्यातून वाचवण्यासाठी त्यांना डिप्रेशनविरोधी औषध पाठवले जात आहे. याशिवाय ड्रायफ्रुट्स आणि मल्टीविटामिन औषधही दिले जात आहे.

  रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव अनुराग जैन यांनी रविवारी सांगितले की, कामगारांना मल्टीविटामिन, अँटीडिप्रेसेंट्स आणि ड्रायफ्रूट्स पाठवले जात आहेत. चांगली गोष्ट म्हणजे वीज कनेक्शन आत सुरू झाले आहे, त्यामुळे बोगद्याच्या आत प्रकाश आहे. पाइपलाइनद्वारेही पाणी पाठवले जात आहे. यासाठी 4 इंचाचा पाइप वापरला जात आहे, साधारणपणे तो कॉम्प्रेशनसाठी वापरला जातो. पहिल्या दिवसापासून या पाईपद्वारे अन्न पाठवले जात आहे.

  24 मीटर खोदकाम केल्यानंतर काम बंद करण्यात आले

  हा बोगदा राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) द्वारे बांधला जात आहे. गेल्या रविवारी (१२ नोव्हेंबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास बोगदा कोसळला होता. तेव्हापासून तेथे बचावकार्य सुरू आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी अमेरिकन औगर मशीनद्वारे ड्रिलिंग करताना काही समस्या आल्याने ते काही काळ थांबवण्यात आले. मात्र, तोपर्यंत ऑगर मशीनने 60 मीटरच्या ढिगाऱ्यापैकी 24 मीटर ड्रिल केले होते.

  पाच पर्यायांवर काम सुरू आहे

  बचाव मोहिमेदरम्यान केंद्र सरकारने शनिवारी उच्चस्तरीय बैठकही घेतली. यामध्ये कामगारांना वाचवण्यासाठी तैनात केलेल्या एजन्सींसोबत 5 पर्यायांवर चर्चा करण्यात आली. NHIDCL चे MD महमूद अहमद यांना सर्व केंद्रीय एजन्सींच्या समन्वयाचे प्रभारी बनवण्यात आले आहे आणि त्यांची सिल्क्यरा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, ओएनजीसी, आरव्हीएनएल, सतलज जल विकास निगम लिमिटेड, बीआरओ आणि राज्य पीडब्ल्यूडी, एनएचआयडीसीएलसह अनेक एजन्सी अडकलेल्या कामगारांना प्रवेश देण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.